
सावंतवाडी : गेली २२ वर्षे सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात प्रामाणिकपणे सेवा देणारे स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. ज्ञानेश्वर दुर्भाटकर हे येत्या 31 मे ला निवृत्त होणार आहेत. त्यामुळे त्यांचे रिक्तपद भरण्यासाठी राजकीय नेते, संघटना आदींनी शासन दरबारी , प्रयत्न करणे गरजेचे आहे. दोडामार्गवासियांची तातडीची गरज म्हणून सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातून दोडामार्ग या ठिकाणी बदलीपर गेलेले स्त्रीरोगतज्ञ डॉ ज्ञानेश्वर ऐवळे यांची सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातील रिक्त जागी नियुक्ती करण्यात यावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
डॉक्टर ऐवळे यांची 2015 साली सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातून दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयात बदली करण्यात आली होती. गेली सहा वर्षे ते दोडामार्ग रुग्णालयात स्त्री रोग तज्ञ म्हणून काम पाहत आहेत. एकाच जागी दोन तज्ञ असण्यापेक्षा दोन ठिकाणी स्त्री रोग तज्ञ नियुक्त करण्यात आले होते. परंतु सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाचे स्त्रीरोग तज्ञ ज्ञानेश्वर दुर्भाटकर हे निवृत्त होत असल्याने या रिक्त होणाऱ्या जागेवर ज्ञानेश्वर ऐवळे यांची नियुक्ती करण्यात यावी अशी मागणी आता होऊ लागली आहे. कारण, वेळीच नव्याने स्त्रीरोगतज्ज्ञ भरती झाल्यास सर्वसामान्य प्रसुती गोरगरीब, सर्वसामान्य रुग्णांना सावंतवाडीत उपचार मिळू शकतील. अन्यथा खासगी रुग्णालयात हजारो रुपये खर्च करून प्रसुती करून घेण्याची वेळ येणार आहे.
डॉ. दुर्भाटकर हे २००१ पासून उपजिल्हा रुग्णालयात स्त्रीरोगतज्ज्ञ म्हणून सेवेत दाखल झाले. गरोदर माता तपासणी, प्रसुती, सीझर यात त्यांचा हातखंडा आहे. २०२२ पर्यंतच्या २२ वर्षांच्या कालावधीत त्यांनी हजारो नॉर्मल प्रसुती व सीझर (ऑपरेशन) यशस्वीपणे केल्या. त्यामुळे रुग्ण व त्यांचे नातेवाईक त्यांना देवदूत संबोधतात जिल्ह्यातून अनेक गरोदर महिला प्रसुतीसाठी उपजिल्हा रुग्णालयातच येतात. त्यामुळे प्रसुती विभाग कायम भरलेला असतो. डॉ. दुर्भाटकर प्रसुती रुग्ण केव्हाही रुग्णालयात दाखल झाला तरी सेवा देतात. डॉ. दुर्भाटकर यांच्यासाठीच हे रुग्णालय ओळखले जाते. अधीक्षकपदी बढती मिळाल्यावर मध्यंतरी त्यांची बदली झाली होती. ही बदली रद्द करण्यासाठी राजकीय व सामाजिक संघटना, नागरिकांनी उपोषण केले होते. त्यानंतर डॉ. दुर्भाटकर यांना त्यांच्याकडे सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षकपदाचा कार्यभार सोपविण्यात आला. वयोमानानुसार ते येत्या 31 मे ला निवृत्त होणार आहेत. त्यामुळे त्यांचे पद रिक्त होऊन रुग्णांची गैरसोय होणार आहे. गोरगरीब रुग्णांना खासगी रुग्णालयात जाण्याची वेळ येणार आहे. त्यामुळे रिक्तपद भरण्यासाठी आणि त्यांच्या या पदावर स्त्रीरोग तज्ञ डॉ. ज्ञानेश्वर ऐवळे यांची नियुक्ती करण्यासाठी आतापासूनच प्रयत्न करणे गरजेचे आहे.