शासन आपल्या दारी ; तहसिलदारांच काम भारी

Edited by:
Published on: August 01, 2023 11:18 AM
views 361  views

सावंतवाडी : आंबोली-चौकुळ येथील म्हाराठी बेरडकी यासारख्या दुर्गम भागात राहणाऱ्या बेरड समाजाच्या लोकांकडे जातीचे दाखले काढण्यासाठी पुरावे उपलब्ध नव्हते. अतिशय दुर्गम भागात कोणत्याही अत्याधुनिक यंत्रणाशिवाय ही बेरड समाजाची लोक राहतात. सिंधुदुर्ग जिल्ह्यासह राज्याच्या सीमेवरच हे शेवटच गाव आहे. बेरड समाजाच्या दोन वाड्या याठिकाणी आहेत. मोठ्या प्रमाणात बेरड समाजाची लोकवस्ती आहे. परंतु, जातीचे दाखले काढण्यासाठी त्यांच्याकडे पुरावे उपलब्ध नाहीत. त्यामुळे शासनाच्या अनेक सोयीसुविधांपासून त्यांना वंचित राहाव लागत होतं. याची दखल घेत तहसिलदार श्रीधर पाटील यांनी थेट म्हाराठी बेरडकी गाव गाठलं. जातीच्या दाखल्यासाठी वाडवडीलांचे पुरावे उपलब्ध नसल्यानं स्थानिक चौकशी करून दाखले काढण्यासाठी लागणारे प्रतिज्ञा पत्र तिथेच वाडीवर तहसीलदारांकडून देण्यात आले. 

मागच्या वर्षी इथला एक मुलगा आयटीआयसाठी गेला होता. त्याला गेल्यावर्षी जातीचा दाखला काढायला मदत केली होती. तिथेच वाडीवर जाऊन त्याला आणि २ मुलांना दाखले दिले होते. आज २६ प्रतिज्ञा पत्र केली.

यातील १२ दाखले या आठवड्यात देण्याचे नियोजन आहे अशी माहिती तहसिलदार श्रीधर पाटील यांनी दिली.

१ ते ७ ऑगस्ट हा आठवडा महसूल सप्ताह साजरा केला जाणार आहे. त्यामध्ये या बेरड समाजाच्या ग्रामस्थांना जातीचे दाखले देण्याचं नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे खऱ्या अर्थानं ''शासन आपल्या दारी'' या राज्य सरकारच्या योजनेचं सार्थक झाल्याची भावना व्यक्त केली जात आहे.