
विद्यामंदिरमध्ये तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन
कणकवली :
विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित होण्यासाठी शासनाकडून विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन केले जात आहे. विद्यार्थ्यांनी वैज्ञानिक प्रयोग करण्यासाठी गुगल, एआयचा वापर केला पाहिजे. वैज्ञानिक प्रतिकृती तयार करण्यासाठी एआयच्या नोटबुक एलएमचा प्रभावीपणे वापर केला पाहिजे. विज्ञान प्रदर्शनातून भविष्यात सिंधुदुर्गातून वैज्ञानिक निर्माण झालेले दिसतील, असा विश्वास गटविकास अधिकारी अरुण चव्हाण यांनी व्यक्त केला.
कणकवली पंचायत समितीच्या शिक्षण विभाग व शिक्षण प्रसारक मंडळाच्या विद्यामंदिर माध्यमिक प्रशालेच्या संयुक्त विद्यमाने विद्यामंदिर प्रशालेत कणकवली तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. याचे उद्घाटन अरुण चव्हाण यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी श्री. चव्हाण बोलत होते. यावेळी सहाय्यक गटविकास अधिकारी मंगेश वालावलकर, गट शिक्षणाधिकारी किशोर गवस, शिक्षण विभागाच्या विस्तार अधिकारी कैलास राऊत, प्रेरणा मांजरेकर, कणकवली महाविद्यालयाचे प्राचार्य युवराज महालिंगे, कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक श्री. माने, विद्यामंदिर प्रशालेचे मुख्याध्याक पी. जे. कांबळे, अच्युत वणवे, रामचंद्र नारकर, शरद चोडणकर, शिवाजी पवार, सूर्यकांत चव्हाण, चंद्रकांत पोकळे, सुशात मर्गज, निलेश ठाकूर, हनुमंत वाळके, एस. एम. हायस्कूलचे मुख्याध्यापक जी. एन. बोडके, संजय पवार, विजय भोगटे, संदीप कदम, चंद्रकांत चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.
किशोर गवस म्हणाले, विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित होण्यासाठी शासनाच्या शिक्षण विभागातर्फे तालुका, जिल्हा, राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करीत आहेत. या प्रदर्शनांमधून वैज्ञानिक निर्माण व्हावेत, हा शासनाचा यामागील उद्देश आहे. भविष्यात या प्रदर्शनांमुळे वैज्ञानिक निर्माण होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. अमेरिकेतील नासा व भारतातील इस्त्रो या संस्था अवकाशाचा अभ्यास करीत आहेत. या संस्थांनी खगोलशास्त्रात अमूलाग्रह घडून आणले आहेत. या संस्थांमुळे केलेल्या संशोधनाचा जगाला फायदा झाला आहे. रासायनिक शेतीमुळे आरोग्य विषयक समस्या निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे शेतकºयांनी सेंद्रीय शेतीकडे वळले पाहिजे आणि नागरिकांचे आरोग्य सदृढ राहण्यासाठी रसायन विरहित अन्न व पदार्थ सेवन करावे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विकसित भारत व आत्मनिर्भर करण्याचे स्वप्न आहे. हे स्वप्नपूर्ण करण्यासाठी देशवासीयांनी खारीचा वाटा उचलावा, असे आवाहन त्यांनी केले. प्लास्टिकमुळे अनेक समस्या निर्माण झाल्या असून या समस्यांवर उपाययोजना करणे गरजेचे आहे. प्लास्टिकचा वापर प्रत्येकाने टाळल्यास काही समस्या कंट्रोलमध्ये येतील, असे गवस म्हणाले.
पी. जे. कांबळे यांनी विज्ञान प्रदर्शन आयोजित करण्यामागील उद्देश सांगितला. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर मान्यवरांचे स्वागत पी. जे. कांबळे व अच्युत वणवे यांनी केले. विद्यामंदिर प्रशालेतर्फे मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. विद्यामंदिरच्या विद्यार्थिनींनी स्वागतगीत सादर करून उपस्थितांची वाहवा मिळवली. सूत्रसंचालन श्री. शिंगाडे यांनी केले. आभार विद्या शिरसाट यांनी मानले. यावेळी केंद्र प्रमुख, शिक्षक संघटनांचे पदाधिकारी व प्रतिनिधी, शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान, प्रदर्शनाच्या उद्घाटनंतर विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या विज्ञान प्रतिकृतींची अरुण चव्हाण यांच्यासह मान्यवरांनी पाहणी केली.










