
सावंतवाडी : राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर आणि मॅटएक्स स्ट्रक्चर प्रा.लि.चे संचालक ओंकार कलवडे यांनी भोसले नॉलेज सिटीला सदिच्छा भेट दिली. 'स्किल डेव्हलपमेंट अँड एम्प्लॉयमेंट अपॉर्च्युनिटीज इन जर्मनी' या उपक्रमांतर्गत नुकताच महाराष्ट्र शासनाचा जर्मनीतील बॅडन-वॉटेनबर्ग या राज्याशी सामंजस्य करार झालेला आहे. जर्मनीमधील नामवंत कंपन्यांचे उत्पादन प्रकल्प या राज्यातच कार्यरत असून भविष्यात त्यांना मोठ्या प्रमाणावर तंत्र कुशल मनुष्यबळाची गरज लागणार आहे. त्यासाठी दोन्हीही राज्यांनी मिळून अल्पमुदतीचा प्रशिक्षण कार्यक्रम तयार केला आहे. राज्यातील निवडक संस्थांमध्ये हा उपक्रम राबविण्याची शासनाची इच्छा असून त्याचीच चाचपणी करण्यासाठी या महत्वपूर्ण योजनेचे अध्यक्ष दीपक केसरकर व मुख्य समन्वयक ओंकार कलवडे यांनी बीकेसीला भेट दिली. संस्थेचे कार्याध्यक्ष अच्युत सावंत भोसले यांनी पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले व जातीनिशी संस्थेतील विविध विभागांची ओळख करून दिली. संस्थेच्या कार्याविषयी गौरवोद्गार काढत पाहुण्यांनी बीकेसीमध्ये हा उपक्रम राबविण्याबाबत सकारात्मक संकेत दिले.