GOOD NEWS | रोजगार मेळाव्यातून पहिल्या टप्प्यात 20 जणांची नियुक्ती

आता कुडाळमध्ये होणार भव्य रोजगार मेळावा
Edited by: भरत केसरकर
Published on: January 15, 2023 19:27 PM
views 139  views

सावंतवाडी : 'ॲडमिशन', 'व्हॅरेनियम क्लाउड' आणि 'सिक्योर क्रेडेंशियल्स' या कंपन्यांच्या माध्यमातून ५ जानेवारी २०२३ रोजी भव्य रोजगार मेळावा सावंतवाडीत जिमखाना मैदानावर संपन्न झाला. या रोजगार मेळाव्याला सिंधुदुर्ग जिल्ह्यातून तसेच जिल्ह्याच्या बाहेरून सुद्धा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. 'आजच मुलाखत; आजच निवड' या संकल्पनेनुसार, या मेळाव्यात रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात आल्या. या रोजगार मेळाव्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील युवक-युवतींना रोजगार मिळाला. या मेळाव्यातून २० जणांना ''व्हॅरेनियम क्लाउड'कडून ''जॉब लेटर'' देण्यात आले. उद्या, सोमवारपासून ''व्हॅरेनियम क्लाउड' कंपनीत २० जणांची नवी टीम रुजू होणार आहे. यामध्ये वेंगुर्ले, सावंतवाडी तसेच कुडाळ तालुक्यातील युवक-युवतींना संधी मिळाली आहे.  तसेच सावंतवाडीत पार पडलेल्या रोजगार मेळाव्यानंतर आता कुडाळमध्ये सुद्धा भव्य असा रोजगार मेळावा होणार आहे. 

    या मेळाव्यातील रोजगारप्राप्त निरवडे येथील शीतल जाधव हिने सांगितले की, मला नव्या करिअरच्या संधी उपलब्ध झाल्यात. मला हवी तशी नोकरी मिळाल्याचा आनंद वाटतो. तर सोनुर्ली येथील सुजाता धडाम म्हणाली की, व्हॅरेनियम क्लाउड'ने नोकरीची संधी दिली. मागील दोन ते तीन वर्षाच्या कोरोना काळात नोकरी नव्हती. पण आता नोकरी उपलब्ध झाली आहे.  

  तर माणगाव श्रेया शेडगे हिने सांगितले की, यापूर्वी अनेक ठिकाणी नोकरीसाठी मुलाखती दिल्या. पण योग्य अशी नोकरी मिळत नव्हती. पण सावंतवाडीत झालेल्या या रोजगार मेळाव्यात 'व्हॅरेनियम क्लाउड'मध्ये मुलाखत दिल्यावर दोन दिवसात जॉब कन्फर्म झाला. त्यामुळे करिअर घडविण्यासाठी नव्या संधी उपलब्ध झाल्या.     

   'ॲडमिशन', 'व्हॅरेनियम क्लाउड' आणि 'सिक्योर क्रेडेंशियल्स' या कंपन्यांनी सिंधुदुर्गातील बेरोजगारांसाठी चांगली संधी उपलब्ध करून दिली. ही निवड झाल्यावर लगेच 'ऑन दी स्पॉट' जॉब लेटर मिळाले. 'व्हॅरेनियम क्लाउड'मुळे भविष्यात करिअरमध्ये प्रगती करता येईल, असेही रोजगारप्राप्त तुळस येथील शमिका नेमळेकर सांगितले. 'व्हॅरेनियम क्लाउड'सारख्या तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपनीने आम्हाला आमच्याच भागात नोकरीची संधी दिली, असे जुई कानविंदे म्हटले.   

  व्हेरेनियम क्लाउड आणि सेक्युर क्रेडेन्शियल यांच्या माध्यमातून कोकणात पहिल्यांदाच बीपीओ म्हणजेच कॉलसेंटर सावंतवाडीत सुरु झाले आहे. यासाठी लागलीच २० उमेदवारांना संधीही देण्यात आलेली आहे. उद्या, सोमवारपासून ते कामाला सुरुवात करणार आहेत. या बीपीओ कॉलसेंटरमुळे स्थानिक मुलांना चांगल्या कंपन्यांमध्ये रोजगाराची संधी उपलब्ध झाली असल्याचे सिक्योर क्रेडेंशियल्स'चे  राहुल बेलवलकर यांनी यावेळी दिली.