सावंतवाडी पत्रकार संघाची गौरवास्पद कामगिरी ; माळवते तालुकाध्यक्ष प्रविण मांजरेकर यांचा विशेष सन्मान !

पत्रकारांच्या एकजुटीमुळेच पदाला न्याय : मांजरेकर
Edited by: विनायक गांवस
Published on: April 08, 2023 18:10 PM
views 222  views

सावंतवाडी : सावंतवाडी तालुका पत्रकार संघाची नुतन कार्यकारिणी निवड प्रक्रिया जिमखाना मैदानावरील सभागृहात जिल्हा पत्रकार संघाच्या सचिव तथा निरिक्षक देवयानी वरसकर व जिल्हा सदस्य दीपेश परब यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. याप्रसंगी माळवते तालुकाध्यक्ष प्रवीण मांजरेकर यांच्यासह मागील कार्यकारिणीनं केलेल्या गौरवास्पद कार्यासाठी त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला.


तालुका पत्रकार संघाला मिळालेला सन्मान, कोरोना काळासह पत्रकारांच्या हितासाठी घेतलेले निर्णय, पत्रकारांसाठी विमा संरक्षण, जिल्हास्तरीय पत्रकार चषक, रक्तदान शिबीरासह सामाजिक जाणीवेतून केलेल्या कार्याचा गौरव म्हणून मावळते अध्यक्ष प्रविण मांजरेकर व कार्यकारिणीचा विशेष सन्मान करण्यात आला.


दोन वर्षांचा कालावधीत पदाला न्याय देण्यासह पत्रकारांच्या हिताचे निर्णय घेण्याचा आम्ही प्रयत्न केला. विविध उपक्रम यशस्वीपणे राबविले. पत्रकार संघातील सर्व सदस्य व कार्यकारिणीनं घेतलेली मेहनत यामुळेच हे शक्य झाल्याची भावना प्रविण मांजरेकर यांनी व्यक्त केली.


याप्रसंगी ज्येष्ठ पत्रकार अण्णा केसरकर, मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष गजानन नाईक, ज्येष्ठ पत्रकार अभिमन्यू लोंढे, कोकणसादचे संपादक सागर चव्हाण, संतोष सावंत, हरिश्चंद्र पवार, शिवप्रसाद देसाई, मोहन जाधव आदी पत्रकार संघाचे पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते.