
वेंगुर्ले : तालुक्यातील उभादांडा गावात गेली कित्येक पिढी पारंपारिक बँड पथकाद्वारे अनेक कलाकार उदर निर्वाह करत आहेत. परंतू आता डीजे, बँजो मुळे ही परंपरा लोप पावत आहे. ह्या कलाकारांना मानधन मिळत नाही. बरेच वाद्य वाजविणारे वयाने व आजाराने सध्या ग्रासले असून त्यांना रोजीरोटीसाठी काहीही पर्याय नाही आहे. तरी आपणाकडून आम्हांला शासन स्तरावर न्याय मिळावा तसेच वाद्यांसाठी शासन निधी मिळावा असे निवेदन महाराष्ट्र ख्रिस्ती अल्प संख्याक जिल्हा उपाध्यक्ष कार्मिस आल्मेडा यांच्या फुढाकाराने शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांना उभादांडा येथील बँड पथक कर्मचाऱ्यांच्या वतीने देण्यात आले.
या निवेदनात असे म्हटले आहे की, आपल्या माध्यमातून जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात विकास निधी देण्यात आला आहे. आणि विकास होताना दिसत आहे. उभादांडा गावात तर मोठ्या प्रमाणात विकास निधी प्राप्त झाला आहे. उभादांडा गावात गेली कित्येक पिढी आम्ही पारंपारिक बँड पथकाद्वारे उदर निर्वाह करत आहोत. जिल्ह्यात मालवण, देवबाग, फणसवाडी, सावंतवाडी, आजगांव, वेळागर, उभादांडा येथे अजूनही ही कला जोपासली जाते. परंतू आता डीजे, बँजो मुळे ही परंपरा लोप पावत आहे. नवीन पिढीला जूने जाणते कलाकार मार्गदर्शन करतात. परंतू ह्या कलाकारांना मानधन मिळत नाही. असेच चालू राहिले तर ही कला कालांतराने बंद होण्याच्या मार्गावर असून कित्येक जणांचे मानधनासाठी अर्ज संबंधित विभागाकडे जमा आहेत. परंतू ह्या कलाकारांना न्याय मिळत नाही. बरेच वाद्य वाजविणारे आज वयाने व आजाराने सध्या ग्रासले असून त्यांना रोजीरोटीसाठी काहीही पर्याय नाही आहे. तरी आपण योग्य ती दखल घेऊन अशा कलाकारांना शासन स्तरावर न्याय मिळवून द्यावा. अशी विनंती मंत्री केसरकर यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.