
चिपळूण : आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीला साथ द्या, कोकणसहित अख्ख्या महाराष्ट्राचा गतिमान विकास साधण्यात आम्ही कुठेही कमी पडणार नाही, असा शब्द देतो. असे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चिपळूण येथे दिले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांची चिपळूण येथे जनसन्मान यात्रा पार पडली. या निमित्ताने आयोजित सभेत ते म्हणाले
राज्य सरकारच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या सर्व योजना या दीर्घकाळ चालाव्यात. परंतु त्याकरता तुमच्या भक्कम पाठिंब्याची गरज आहे, तुमच्या आशीर्वादाची गरज आहे. येणाऱ्या निवडणुकीत तुम्ही सर्वांनी महायुतीला साथ द्या. काँग्रेसवाले म्हणतात आमची सत्ता आल्यानंतर आम्ही लाडकी बहीण योजना बंद करून त्यावर अजित पवार आजच्या सभेत म्हणाले ही योजना बंद करण्यासाठी काँग्रेसच्या घरचा पैसा आहे का ? ज्या पद्धतीने पुरुष वर्ग आपल्या स्वप्नांसाठी लढतो, झगडतो आणि स्वप्नं पूर्णत्वास नेतो, त्याचप्रमाणे स्वप्न पूर्ण करण्याचा अधिकार महिला वर्गाला सुद्धा आहे. मात्र माझी मायमाऊली आपल्या इच्छांना मुरड घालते. आपल्या कुटुंबासाठी, मुलाबाळांसाठी राब-राब राबते. मनी बाळगलेल्या इच्छा-आकांक्षा बहिणींना सुद्धा पूर्ण करता याव्यात, यासाठी आम्ही माझी लाडकी बहीण योजना राज्यभर व्यापक स्तरावर राबवण्यास सुरुवात केली आहे. ज्या महिला या योजनेपासून वंचित राहिल्यात त्यांना दुसऱ्या टप्प्यात योजनेचा लाभ मिळेल. सर्व समाज घटकातील गोरगरिबाची लेक चांगली शिकली पाहिजे, तिने तिच्या कुटुंबाला आर्थिक पाठबळ दिले पाहिजे, यासाठी आम्ही मुलींसाठी शिक्षण मोफत केले आहे. खास महिलांसाठी पिंक ई-रिक्षा योजनेंतर्गत रिक्षा उपलब्ध करून देण्यात आल्या असून त्यातून माझ्या बहिणी सुरक्षित प्रवास करीत आहेत. शेतकरी बांधवांना बळ देण्यासाठी आम्ही वीज बिल माफी दिली आहे. दुधावर प्रति लिटर पाच रुपये अनुदान देऊ केले आहे. एक रुपयात पीक विमा योजना आणली आहे. तसेच आम्ही माझी लाडकी बहीण योजना आणली तशी वर्षाला तीन गॅस सिलेंडर मोफतची योजना आणली. आमची मनापासून इच्छा आहे की. महायुतीच्या सरकारमध्ये राहून समाजातील सर्व घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न मी केला आहे. असे पवार यांनी सांगितले. राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार सुनील तटकरे म्हणाले, राज्याचे वित्तमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी महिला, शेतकरी, मजूर, उद्योजक, कष्टकरी व जनतेच्या हिताचे निर्णय घेतले आहेत.
लाडकी बहीण योजना फसवी असल्याचे नरेटिव्ह सेट केले जात आहे. तथापि अजित पवार शब्दाला पक्के असल्याने त्यांनी जाहीर केलेल्या योजना पूर्णत्वाकडे जातील. खोटे नरेटिव्ह सेट करून लोकसभा निवडणुकीत यश मिळाल्याने विरोधकांनी हुरळून जाऊ नये, विधानसभा निवडणुकीत लोकसभेतील अपयशाची सव्याज परतफेड करू, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. आमदार शेखर निकम यांनीही यावेळी आपले मनोगत व्यक्त केले.