
मंडणगड : येथील सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळाच्या लोकनेते गोपीनाथजी मुंडे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष, महिला विकास कक्ष, विशाखा समिती यांच्या वतीने व तालुका प्राथमिक आरोग्य केंद्र मंडणगड यांच्या सहकार्याने नुकतेच हिमोग्लोबीन तपासणी शिबीर व मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राहूल जाधव होते. यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्र नारगोलीचे समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. तौफिक शेख, संजना सारंग, सोनाली श्रावणपाटील आशा आरोग्यसेविका श्रीशा सापटे, मंदाकिनी जाधव, लॅब तंत्रज्ञ आशीष किर, भूमिका पोस्टूरे, विजय उनाळे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीस प्राचार्य डॉ. राहूल जाधव यांच्या हस्ते उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत करण्यात आले. तत्पूर्वी डॉ. संगीता घाडगे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.
मार्गदर्शन करताना डॉ. तौफिक शेख म्हणाले की, मुलींनी आपल्या अरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. अनियमित मासिक पाळी, शरिरात हिमोग्लोबीनची कमतरता. भावी जीवनात या समस्या निर्माण होवू नयेत म्हणून सकस आहार, व्यायाम व आवश्यक असेल तर डॉक्टरांचा सल्ला घेणे महत्वाचे आहे. यावेळी त्यांनी हिमोग्लोबिनचे महत्व, रक्तातील त्याचे योग्य प्रमाण किती असावे, शरिरामध्ये हिमोग्लोबिन कमी असल्यावर त्याचा आरोग्यावर होणारा दुष्परिणाम तसेच हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी आहारात कोणता बदल करावा आदी बाबींवर सविस्तर व सोप्या भाषेत मार्गदर्शन केले.
प्राचार्य डॉ. राहूल जाधव यांनी सांगितले की, आजच्या धकाधकीच्या व तणावपूर्ण जीवनामध्ये आपली जीवनशैली बदललेली आहे. अवेळी जेवन, फास्टफुडचे सेवन, व्यायामाचा अभाव यामुळे मूलींमध्ये अनेक समस्या निर्माण होत आहेत. याकरिता वेळीच आपण सर्वांनी जागृत होवून आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी व निरोगी जीवन जगावे. यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्राचे लॅब तंत्रज्ञ आशीष किर, संजना सारंग, सोनाली श्रावणपाटील आशा आरोग्यसेविका श्रीशा सापटे, मंदाकिनी जाधव, भूमिका पोस्टूरे, विजय उनाळे यांनी मुलींची मोफत हिमोग्लोबिन तपासणी केली. यामध्ये महाविद्यालयातील विद्यार्थी व विद्यार्थिनींनी उत्स्फुर्त सहभाग नोंदवला. शेवटी उपस्थित सर्वांचे आभार विशाखा कक्षाच्या समन्वयक डॉ. संगीता घाडगे यांनी मानले.