'घुंगुरकाठी'तर्फे कळणेत २३ ऑगस्टला देशभक्तीपर समुहगीत स्पर्धा

Edited by:
Published on: August 13, 2024 11:15 AM
views 175  views

सिंधुदुर्ग : 'घुंगुरकाठी, सिंधुदुर्ग' या स्वयंसेवी संस्थेने कळणे (ता. दोडामार्ग) येथे २३ ऑगस्ट रोजी देशभक्तीपर समुहगीत स्पर्धेचे आयोजन केले आहे. दोडामार्ग व सावंतवाडी तालुक्यापुरती ही स्पर्धा मर्यादित असून प्राथमिक व माध्यमिक अशा दोन गटात होणार आहे, अशी माहिती संस्थेच्या उपाध्यक्षा डॉ. सई लळीत यांनी आज दिली.

याबाबत अधिक माहिती देताना डॉ. लळीत म्हणाल्या की, विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीची भावना अधिक दृढ व्हावी, याबरोबरच त्यांना संगीताची आवड निर्माण व्हावी, सांघिक ताकद कळावी, यासाठी या स्पर्धेचे आयोजन केले आहे. नूतन हायस्कुल, कळणेचे मुख्याध्यापक एम. व्ही. देसाई, संगीत शिक्षक पी. जी. गोसावी यांच्या सक्रीय सहकार्याने ही स्पर्धा कळणे हायस्कुल येथे होत आहे. चवथी ते सातवी (प्राथमिक) आणि आठवी ते दहावी (माध्यमिक) अशा दोन गटात ही स्पर्धा होईल. स्पर्धेत दोडामार्ग व सावंतवाडी तालुक्यातील शाळा व माध्यमिक विद्यालये भाग घेऊ शकतील. दोन्ही गटात प्रत्येकी दहा पथकांना प्रवेश दिला जाणार आहे. नूतन हायस्कुल, कळणे येथे दि. २३ ऑगस्ट रोजी सकाळी ९.३० वाजता स्पर्धेचा उद्घाटन समारंभ होईल. सकाळी १० वाजता स्पर्धेला सुरुवात होईल. पथकांनी सकाळी ९.१५पर्यंत स्पर्धेच्या ठिकाणी पोचावे. स्पर्धेसाठी तीन परीक्षक असणार आहेत.

डॉ. लळीत पुढे म्हणाल्या की, प्रत्येक पथकात किमान सात ते कमाल बारा विद्यार्थी, विद्यार्थिनी असणे आवश्यक आहे.  गायनासाठी  पाच ते सात मिनिटे वेळ दिला जाईल. पथकातील सदस्यांनी शाळेचा गणवेश किंवा शोभेल अशी समान वेशभूषा करावी. साथसंगतीसाठी वाद्ये व वादक पथकाने सोबत आणावेत. दोन्ही गटात प्रथम पारितोषिक रु. १५००, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह, दुसरे पारितोषिक रु. १२०० व प्रमाणपत्र व तिसरे पारितोषिक रु. १००० व प्रमाणपत्र दिले जाईल. सर्व सहभागी पथकांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येईल. स्पर्धेसाठी कोणतेही प्रवेशशुल्क नाही. तसेच कोणत्याही पथकाला प्रवासखर्च दिला जाणार नाही. पथकातील सर्व विद्यार्थी संबंधित गटातील असल्याचे मुख्याध्यापक यांचे पत्र पथकप्रमुखाने स्पर्धेवेळी सादर करणे आवश्यक आहे.

स्पर्धेत दोन्ही गटात प्रथम नोंदणी करणाऱ्या प्रत्येकी फक्त दहा पथकांना प्रवेश मिळणार असल्याने संबंधित शाळांचे मुख्याध्यापक किंवा संगीतशिक्षक यांनी सतीश लळीत (९४२२४१३८००) या वॉटसअप क्रमांकावर शक्य तेवढ्या लवकर आपल्या पथकाची नोंदणी करावी. ज्यांची निवड होईल, त्यांना तसे कळविण्यात येईल. मात्र नोंदणी करुन ती नंतर रद्द करु नये. कारण त्यामुळे एका पथकाची संधी हुकेल, असे आवाहन डॉ. लळीत यांनी केले.