हरवलेली माणूसकी इथं सापडली ; मुक्या जीवाप्रती त्यांनी भुतदया दाखवली

Edited by: विनायक गावस
Published on: July 30, 2023 11:25 AM
views 354  views

सावंतवाडी : एकीकडे माणूसकी नावाची चीज हरपत चाललेली आहे. रोज घडणाऱ्या घटना पाहता माणसाच हृदय एवढ निष्ठुर कसं झालं ? हाच सवाल उपस्थित होतो. मात्र, कोलगावातील काही तरूणांनी मुक्या प्राण्यावर भुतदया दाखवत माणसातील 'माणूसकी' अजूनही संपलेली नाही हे सिद्ध केलय.

माणूस बेईमान होईल पण, प्राणी होत नाही. मुक्या प्राण्यांवर दया केल्यास, त्यांना जीव लावल्यास, सेवा-शुश्रुषा केल्यास प्राणी माणसांना विसरत नाहीत. अशीच एक घटना कोलगाव गावात घडली. गेले तीन महिने एक गाय व तिची तीन वासरं खाण्याच्या शोधात फिरत आहेत. त्यातील एक गाईचे वासरू आजारी आहे. अशावेळी माणुसकी दाखवत कोलगावातील काही ग्रामस्थ हा मुका जीव आजारातून कसा बरा होईल, यासाठी धडपडत आहेत.

त्या आजारी वासराच्या शुश्रुषेसाठी कोलगावातील ग्रामस्थ पुढे आलेत. भुकेसाठी  फिरणाऱ्या गाई-वासरांतील एक वासरू सोमवारी कोलगाव चर्चनजीक जोसेफ गॅरेज येथे आजारी अवस्थेत बसून होते हे काही ग्रामस्थांच्या निदर्शनास आल. यावेळी त्यांनी वासराच्या मालकाची विचारपूस केली. मात्र, त्यांच्या मालकांचा शोध सुरू असून ते अद्याप सापडलेले नाहीत. यावेळी वासरू आजारी असल्याने त्याची काळजी घेण्यासाठी सर्व ग्रामस्थ एकवटले. त्या वासराचे जमिनीला पाय लागत नसून त्याचे पोट फुगले आहे. त्यामुळे त्या वासराला कोणतीही हालचाल करता येत नाही.

त्याची प्रकृती सुधारावी म्हणून सर्वांचे प्रयत्न सुरू आहेत.कोलगाव येथील ग्रामस्थ बस्त्याव डिसोजा  यांनी त्या वासराची शुश्रुषा करण्यासाठी रात्रीच्यावेळी विजेची सोय केली. तर तानाजी नाईक यांची सुन सौ. नाईक या दररोज वासरासाठी दुधाची व्यवस्था करीत आहेत. रवी परांजपे यांनी वासराच्या खाण्याची व्यवस्था म्हणून पेंड दिली असून त्यांनी धूपचीही व्यवस्था केली आहे. लतिफ बेगचे यांचे चिरंजीवांनी डॉक्टर करोल यांना पाचारण करून त्या वासरावर औषधोपचाराची सोय केली. कृष्णा जाधव, कृष्णा उर्फ भाई कदम, राकेश यांनी वासरासाठी गवताची सोय केली आहे.


गेले पंधरा दिवस  बस्त्याव डिसोजा , कांतू वाडकर, रवी परांजपे, संजय पाटणकर, राज चव्हाण, अक्षय चव्हाणअक्षय सांगेलकर, संचित दळवी,  सौ. नाईक, सिद्धेश ठिकार ,डॉ. करोल, बेग, इलू दाभोलकर, स्वामी कुडतडकर ,पप्पू कुडतडकर, गणपत कुडतडकर, रुपेश कुडतडकर, सुगंधा कुडतडकर, अक्षय सांगेलकर यांनी दिवसरात्री वासरासाठी गुळाचे पाणी, धूप दाखविणे, दूध भरविणे, गवत तसेच इतर सेवा देत आहेत. यातून मुक्या प्राण्यांवर दया करा व त्यांची सेवा करा असेच  माणसातील माणुसकीचे दर्शन कोलगाववासीयांनी दाखवून दिले आहे. मात्र, या गाई-वासरांच्या मालकांविषयी ग्रामस्थांमध्ये संताप असून अद्याप त्या मालकाने कोणतीही दखल घेतलेली नाही. वासराच्या मालकांनी ९४२२९४२९२९ या नंबरवर संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे.

एकंदरीतच, एकीकडे माणूसकी संपत चाललेली असताना दुसरीकडे कोलगाव गावातील या ग्रामस्थांनी मुक्या जीवनाबद्दल दाखवलेली भुतदया म्हणजे अजूनही माणसातील माणूसकी जीवंत असल्याच एक द्योतक आहे.