
देवगड : देवगड तालुक्यातील राकस घाटी येथे गवारेड्याच्या हल्ल्यात हडपीड येथील शशांक प्रकाश राणे (३० वर्षे) हा दुचाकीस्वार गंभीर रित्या जखमी झाला आहे. देवगड – नांदगांव मार्गावर शिरगांव – राकसघाटीच्या तीव्र वळणावर गवारेड्याच्या हल्ल्यात हडपीड येथील शशांक प्रकाश राणे (३० वर्षे) हे दुचाकीस्वार गंभीर जखमी झाले आहेत.
शशांक राणे हे काल रात्री देवगडहून दुचाकीने आपल्या हडपीड येथील घरी जात असताना शिरगांव – राकसघाटी येथील वळणावर गवारेड्याच्या हल्ल्यात गंभीररित्या जखमी झाले. या हल्ल्यात त्यांचा चेहरा, खांदा, दोन्ही हात तसेच पायालाही दुखापत झाली आहे. त्यांच्यावर शिरगांव येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तसेच दुचाकीचे देखील मोठे नुकसान झाले आहे.
देवगड – नांदगांव मार्गावर शिरगाव- राकसघाटी येथील रस्त्याच्या दुतर्फा जंगलमय भाग असून या परिसरात गव्यांचा सायंकाळ नंतर रात्री उशिरापर्यंत मुक्तपणे संचार असल्यामुळे वारंवार निदर्शनास आले आहे. गेल्या आठ महिन्यातील ही चौथी घटना आहे. यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.