
सिंधुदुर्ग : श्रावण महिना सुरू झाल्याने गणेश चतुर्थीचे वेध लागले आहेत. चतुर्थी अवघ्या काही दिवसांवर आल्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गणेशमूर्तींच्या कार्यशाळांमध्ये लगबग सुरू झाली आहे. विशेष म्हणजे, या वर्षीही मूर्तिकार शाडूच्या मातीपासून बनवलेल्या गणपती मूर्तींना प्राधान्य देत आहेत. पर्यावरणाचे रक्षण आणि धार्मिक मान्यता लक्षात घेऊन मूर्तिकार हा निर्णय घेत आहेत.
मूर्तिकार राजन नारिंगरेकर आणि संतोष सुकाळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्लास्टर ऑफ पॅरिस (POP) पासून बनवलेल्या मूर्ती केवळ निसर्गासाठीच नव्हे तर धार्मिकदृष्ट्याही योग्य मानल्या जात नाहीत. पीओपीच्या मूर्तींमुळे देवांची विटंबना होते, असे त्यांचे मत आहे. त्यामुळे सिंधुदुर्गमध्ये शाडूच्या मातीच्या मूर्तींनाच जास्त पसंती मिळत आहे.
या कामाला गती देण्यासाठी माजी आमदार दीपक केसरकर यांनी सुरू केलेल्या 'चांदा ते बांदा' योजनेचा मोठा फायदा मूर्तिकारांना होत आहे. या योजनेतून मूर्तिकारांना माती मळणी यंत्रे देण्यात आली आहेत. या यंत्रांमुळे कमी मनुष्यबळात आणि कमी वेळेत मूर्ती बनवणे सोपे झाले आहे. ही योजना जिल्ह्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरली असून, त्यामुळे स्थानिक मूर्तिकारांना मोठा आधार मिळाला आहे. यामुळे पर्यावरणाची काळजी घेत, पारंपरिक पद्धतीने गणपती बाप्पाची मूर्ती तयार करण्याचा कल जिल्ह्यात वाढत आहे.