सावंतवाडीचा 'भावी आमदार' राष्ट्रवादीच्या व्यासपीठावर !

Edited by: विनायक गावस
Published on: June 21, 2023 16:54 PM
views 155  views

सिंधुदुर्ग : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्यावर वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला. सर्वपक्षीय नेतेमंडळीनी एकाच व्यासपीठावर उपस्थित राहत अमित सामंत यांना वाढदिनी शुभेच्छा दिल्या. राजकारणाच्या आखाड्यात एरवी दररोज भिडणाऱ्या नेत्यांमधील मैत्री या निमित्ताने पहायला मिळाली.


राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांचा वाढदिवस कुडाळ येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सर्वपक्षीय नेतेमंडळीनी एकाच व्यासपीठावर उपस्थित राहत अमित सामंत यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. प्रतिस्पर्धी असणाऱ्या भाजप, मनसेसह मित्रपक्ष शिवसेना ठाकरे गट, कॉंग्रेसच्या नेत्यांनी यावेळी उपस्थिती दर्शविली होती.  सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत केक कापून अमित सामंत यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते, राष्ट्रवादीच्या कोकण विभाग महिला अध्यक्षा अर्चना घारे-परब, शिवसेना नेते संदेश पारकर, माजी आमदार परशुराम उपरकर, भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली, आमदार वैभव नाईक आदींनी भविष्यातील राजकीय वाटचालीकरीता श्री. सामंत यांना  शुभेच्छा दिल्या. 


आ. वैभव नाईक, राजन तेलींची राजकीय जुगलबंदी


वाढदिवसानिमित्त कुडाळमध्ये सर्वपक्षीय नेतेमंडळी एकाच बॅनरखाली आल्यानं भविष्यातील राजकीय गणितांबाबतच भाष्य उपस्थित नेत्यांनी केल. ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक व भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्यात राजकीय उलथापालथीवरून चांगलीच जुगलबंदी रंगली. यावेळी आमदार वैभव नाईक म्हणाले, महाविकास आघाडी म्हणून आम्ही एकत्र काम करत आहोत. भविष्यात काही लोक आमच्यासोबत असतील ते देखिल व्यासपीठावर उपस्थित आहेत. त्यामुळे 'मविआ'ला एकत्रित ठेवण्याची जबाबदारी अमित सामंत यांच्यावर आहे असं विधान केलं. यावर भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी वैभव नाईक आपण कुठे आहात ? काल सर्वे आला आहे. त्यामुळे आज इथे कोण आहे अन् कुठे कोण जाईल ? हे सांगणं कठीण आहे असं प्रत्युत्तर दिले.


  'कार्यक्रम' कुडाळचा चर्चा सावंतवाडीची


दरम्यान, अमित सामंत यांना शुभेच्छा देताना तेली म्हणाले, आपल्या राजकीय इच्छा पुर्ण होवो. जोपर्यंत वैभव नाईक आहेत तोपर्यंत ती इच्छा पुर्ण होणार नाही. मतदारसंघ तरी वाढवावे लागतील अस विधानं तेलींनी केलं असता संदेश पारकर यांनी सावंतवाडीचा उल्लेख केला. यावर तेली यांनी सावंतवाडीत त्यांच स्वागतच आहे. सगळ्यांचा बंदोबस्त सगळ्यांनी मिळून करू, काही काळजी करायची काळजी नाही. त्यांना शिक्षण देत राहूदेत आपण योग्य कार्यक्रम करू असं विधान केलं.


मनोगत प्रसंगी राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी उपस्थितांचे व वाढदिनी शुभेच्छा देणाऱ्यांचे आभार मानले. ते म्हणाले,  राजकारणात कोण कधी कूठे जाईल हे सांगता येत नाही या तेलींच्या मताशी मी सहमत आहे. सकाळचा माणूस संध्याकाळी कोणत्या पक्षात जाईल हे सांगता नाही येत‌. पण, पुढचा सावंतवाडीचा आमदार हा याच व्यासपीठावरचा असणार एवढं नक्की आहे. कोण असणार, कुठल्या पक्षाचा असणार ? ते आता सांगता येणार नाही. पण सावंतवाडीचा भावी आमदार'राष्ट्रवादीच्या व्यासपीठावरचाच असणारं असं वक्तव्य राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी केले. त्यासाठी सर्वांनी एकत्रित काम केलं पाहिजे या तेलींच्या मताशी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सहमत आहेत. शिक्षणाचा घोळ कुणाला घालायचा तो घालत राहूदेत‌. आपण आपलं काम करत राहू पण सावंतवाडीचा भावी आमदार या व्यासपीठावरचा असवा अशी आपली भावना आहे असं मत अमित सामंत यांनी व्यक्त केले.


याप्रसंगी ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक, भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली, राष्ट्रवादीच्या कोकण विभाग महिला अध्यक्षा अर्चना घारे-परब, माजी आमदार परशुराम उपरकर, शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख संजय पडते, संदेश पारकर, कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख, अमरसेन सावंत, अभय शिरसाट, कुडाळ नगराध्यक्षा अक्षता खटावकर यांसह सर्वपक्षीय नेतेमंडळीनी, राष्ट्रवादीचे जिल्ह्यातील पदाधिकारी कार्यकर्ते व अमित सामंत प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.