केसरकरांच्या माध्यमातून सावंतवाडी मतदारसंघाला ४० कोटींचा निधी

मतदार संघातील आरोग्य विषयक प्रश्नांसंबंधी आरोग्यमंत्र्यांशी सकारात्मक चर्चा वैद्यकीय अधिकारी व इतर सर्व पदे लवकरात लवकर भरली जाणार
Edited by: विनायक गावस
Published on: December 15, 2023 18:43 PM
views 218  views

सावंतवाडी :  महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांच्या माध्यमातून विविध कामांसाठी अर्थसंकल्पात 40.00 कोटींचा भरघोस निधी प्राप्त झाला आहे. सावंतवाडी तालुक्यातील रस्त्यांसाठी 11.70 कोटी व पुलांसाठी 9.35 कोटींचा मंजूर झाला आहे.दोडामार्ग तालुक्यासाठी रस्त्यांसाठी 4.30 कोटी तर पुलांसाठी 3.85 कोटी निधी मंजूर झाला आहे. वेंगुर्ले तालुक्यातील रस्त्यांसाठी 3.90 कोटी तर पुलांसाठी 6.90 कोटी निधी मंजूर झाला. अशा प्रकारे मतदारसंघातील रस्त्यांसाठी 19.90 कोटी व पूलांसाठी 20.10 कोटी मिळून एकूण 40.00 कोटी निधी मंजूर झाला आहे.

मतदारसंघातील आरोग्य विषयक समस्यांसाठी दीपक केसरकर यांनी महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांच्या उपस्थितीत त्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेऊन मतदारसंघातील विविध आरोग्य विषयक समस्यांबाबत चर्चा केली. या बैठकीमध्ये सकारात्मक चर्चा होऊन मंत्र्यांनी संबंधितांना वैद्यकीय अधीक्षक व वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे तात्काळ भरणे बाबत निर्देश दिले आहेत. त्याचबरोबर सावंतवाडी, दोडामार्ग, शिरोडा व वेंगुर्ले येथील विशेष तज्ञ वैद्यकीय अधिकारी औषध निर्माण अधिकारी, रक्तपेढी वैज्ञानिक अधिकारी, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी इत्यादी पदे तात्काळ भरण्याच्या सूचना देण्यात आले आहेत. त्यानुसार सावंतवाडी मतदारसंघाच्या आरोग्य सुविधांमध्ये लवकरच सुधारणा होणार आहे.

तसेच रुग्णालय इमारत विद्युत व पाणी वापर मासिक देयकाना अनुदान व कंत्राटी सेवा वेतनाकरिता अनुदान डिसेंबर अखेरपर्यंत उपलब्ध करून देण्यात येणार आहे. भूलतज्ज्ञ डॉक्टरांचे प्रलंबित देयक सुद्धा डिसेंबर अखेरपर्यंत आदा करण्यात येणार आहे. वेंगुर्ले येथील जुन्या निवासस्थानाच्या जागी वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी नवीन बहुमजली इमारत बांधकामाचा प्रस्ताव सादर केला जाणार आहे तसेच उपजिल्हा रुग्णालय शिरोडा व वेंगुर्ले येथे शवविच्छेदन गृह बांधणे बाबत प्रस्तावित सादर करण्याचे निर्देश आरोग्य मंत्री यांनी दिलेले आहेत. सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री यांच्या आरोग्य यांच्या अध्यक्षतेखाली नागपूर येथे झालेल्या या बैठकीला नामदार दीपक केसरकर यांच्या समवेत सार्वजनिक आरोग्य विभागाचे अप्पर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, आयुक्त सार्वजनिक आरोग्य धीरजकुमार, उपसंचालक, सार्वजनिक आरोग्य विभाग कोल्हापूर, जिल्हा शल्य चिकित्सक सिंधुदुर्ग, श्रीपाद पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.