
सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकरी आधीच रानगव्यांच्या त्रासाने हैराण झाले असताना आता फळमाशी आणि किड्यांच्या नव्या संकटामुळे त्यांच्यासमोर मोठी समस्या उभी राहिली आहे. या नव्या संकटामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे.
कुडाळमधील तुळसुली भागात एका शेतकऱ्याने आपल्या एक एकर शेतात काकडीची लागवड केली होती. गणेश चतुर्थीच्या काळात माटवीसाठी काकड्यांना मोठी मागणी असते, त्यामुळे चांगला नफा मिळण्याची अपेक्षा होती. मात्र फळमाशी आणि किड्यांच्या प्रादुर्भावामुळे शेतकऱ्याच्या स्वप्नांवर पाणी फिरले आहे.
या किड्यांच्या हल्ल्यामुळे अनेक काकड्या पूर्णपणे कुजून गेल्या आहेत, तर काही काकड्या आकाराने खूपच लहान राहिल्या आहेत. यामुळे शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. एकापाठोपाठ एक येणाऱ्या या संकटांमुळे शेतकरी हवालदिल झाला असून त्याला आता प्रशासनाकडून मदतीची अपेक्षा आहे.