
कणकवली : लव्ह जिहाद व त्यातून होणाऱ्या धर्मांतराच्या गंभीर समस्येबाबत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील माध्यमिक शाळा तसेच ज्युनिअर व सिनिअर कॉलेजमधील मुलींमध्ये जनजागृती व्हावी, या उद्देशाने पालकमंत्री नितेश राणे यांच्या संकल्पनेतून मुलींसाठी 'केरळा स्टोरी 2' या चित्रपटाचा मोफत शो आयोजित करण्यात आला आहे. कणकवली येथील लक्ष्मी चित्रमंदिरमध्ये आज मोफत शो चा शुभारंभ करण्यात आला.
यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, शहराध्यक्ष अण्णा कोदे,नगरसेविका मेघा गांगण, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री, संदीप सावंत,सुप्रिया मेस्त्री, शीतल दळवी, समीर प्रभुगावकर, मेघा सावंत, आर्या राणे, प्रतीक्षा सावंत, अभय गावकर, व्यवस्थापक राजू मल्हार,दत्तात्रय खुडे, घनश्याम चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.
हिंदू धर्मीय मुलींना फसव्या प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांचे इस्लाम धर्मात धर्मांतर करण्याच्या लव्ह जिहादच्या घटनांबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत आहे. लव्ह जिहादचे बळी ठरलेल्या मुलींच्या आयुष्याची धर्मांतरानंतर कशी फरफट होते, हे या चित्रपटातून दाखविण्यात आले आहे. या माध्यमातून मुलींमध्ये जागरूकता निर्माण व्हावी, हा या उपक्रमामागील उद्देश असल्याचे भाजपा तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री यांनी सांगितले.
पालकमंत्र्यांच्या संकल्पनेनुसार भाजपा कणकवली तालुक्याच्या वतीने किशोरवयीन मुली, तसेच ज्युनिअर आणि सिनिअर कॉलेजमधील विद्यार्थिनींसाठी हा चित्रपट मोफत दाखविण्यात येणार आहे.
मुलींना 'केरळा स्टोरी 2' हा चित्रपट मोफत पाहायचा आहे, त्यांनी भाजपा कणकवली तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री (मो. 9577654565), भाजपा कणकवली शहराध्यक्ष अण्णा कोदे (मो. 9422381900) किंवा नगरसेविका मेघा गांगण (मो. 9152120512) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.










