घरकुल लाभार्थ्यांना तातडीने ५ ब्रास मोफत वाळू द्यावी

तेंडोली ग्रामस्थांचे तहसीलदारांना निवेदन
Edited by: निलेश ओरोसकर
Published on: October 14, 2025 15:53 PM
views 93  views

कुडाळ : पंतप्रधान आवास योजनेंतर्गत मंजूर झालेल्या घरकुलांची कामे सुरू करण्यासाठी होत असलेला दबाव आणि घर बांधणीसाठी वाळू व चिऱ्यांची असलेली अनुपलब्धता या गंभीर समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी तेंडोली (ता. कुडाळ) येथील ग्रामस्थांनी कुडाळ तहसीलदारांना निवेदन दिले. शासनाच्या धोरणानुसार घरकुल लाभार्थ्यांना तातडीने ५ ब्रास मोफत वाळू उपलब्ध करून द्यावी, अशी आग्रही मागणी यावेळी करण्यात आली.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात पंतप्रधान आवास योजनेंतर्गत जवळपास १० हजारहून अधिक घरकुले मंजूर झाली आहेत. सध्या पाऊस असल्यामुळे आणि आवश्यक बांधकाम साहित्य, विशेषतः वाळू आणि चिरे उपलब्ध नसल्याने घरकुलांची कामे सुरू करणे लाभार्थ्यांना शक्य होत नाहीये. असे असतानाही ग्रामपंचायत आणि गटविकास अधिकारी यांच्यामार्फत कामे सुरू करण्यासाठी लाभार्थ्यांवर दबाव आणला जात आहे. त्यामुळे घरबांधणी कशी करावी, असा प्रश्न लाभार्थ्यांना पडला आहे.

या पार्श्वभूमीवर, तेंडोली ग्रामस्थांनी एकत्र येत येथील सरपंच मा. सौ. अनघा तेंडोलकर, जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष मा. विजय प्रभु, तेंडोलीचे उपसरपंच श्री. आकाश मुणनकर आणि सामाजिक कार्यकर्ते श्री. सत्यवान तेंडोलकर यांच्या नेतृत्वाखाली कुडाळचे तहसीलदार, प्रांताधिकारी आणि गटविकास अधिकारी यांची भेट घेतली.

 शासनाच्या धोरणानुसार घरकुल लाभार्थ्यांना घरबांधणीसाठी तातडीने ५ ब्रास वाळू मोफत उपलब्ध करून द्यावी. बांधकाम साहित्य उपलब्ध होईपर्यंत आणि सध्याच्या पावसाळ्याची परिस्थिती पाहता घरकुल बांधणीसाठी लाभार्थ्यांना मुदतवाढ देण्यात यावी.

यावेळी निवेदन देताना तेंडोली गावातील पंढरीनाथ सर्वेकर, महादेव चव्हाण, कल्पना चव्हाण, गणेश तेंडुलकर, बाबू पाटकर, मेघश्याम सर्वेकर, सुधीर राऊळ आणि इतर लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. घरकुल लाभार्थ्यांच्या अडचणी लक्षात घेऊन प्रशासनाने यावर तातडीने तोडगा काढावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.