कुडाळ - अक्कलकोट बस आरक्षणात गैरव्यवहार ; स्वामीभक्तांचा उद्रेक

20 जागा रिक्त तरी आरक्षण नाकारले !
Edited by: मेघनाथ सारंग
Published on: July 01, 2025 13:30 PM
views 217  views

कुडाळ : गेली 25 वर्षांपासून गुरुपौर्णिमेनिमित्त अक्कलकोट वारी करणाऱ्या कुडाळ येथील स्वामीभक्तांना यंदा मोठा मनस्ताप सहन करावा लागला आहे. 8 जुलै रोजी पणजी-अक्कलकोट बसचे आरक्षण मिळवण्यासाठी कुडाळ डेपोतील आरक्षण केंद्रावर संपर्क साधला असता, बस पूर्ण भरल्याचे कारण देत त्यांना आरक्षण नाकारण्यात आले. धक्कादायक बाब म्हणजे, प्रत्यक्षात मात्र बसमध्ये तब्बल 20 ते 22 जागा रिकाम्या असल्याचे समोर आले आहे. या गंभीर प्रकारामुळे संतप्त झालेल्या स्वामीभक्तांनी माजी नगरसेवक राकेश कांदे यांच्यासह कुडाळ बसस्थानक आगार प्रमुख रोहित नाईक यांची भेट घेऊन तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली.

गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने दरवर्षी मोठ्या संख्येने कुडाळचे स्वामीभक्त अक्कलकोटला जातात. त्यानुसार, यंदाही 8 जुलै रोजीच्या पणजी - अक्कलकोट बसमध्ये आरक्षण मिळवण्यासाठी 28 जून रोजी कुडाळ डेपोतील काउंटरवर संपर्क साधण्यात आला होता. त्यावेळी, बस पूर्णपणे भरली असल्याचे कारण देत त्यांना आरक्षण नाकारण्यात आले. एवढेच नव्हे, तर दोन दिवसांनी पुन्हा चौकशी केली असता, तेच उत्तर देण्यात आले.

मात्र, काल (अंदाजे 30 जून रोजी) काही स्वामीभक्तांनी स्वतः बस डेपोत जाऊन आरक्षणासंदर्भात पाहणी केली असता, त्याच तारखेला बसमध्ये 20 ते 22 जागा रिकाम्या असल्याचे निदर्शनास आले. हा प्रकार समोर आल्यानंतर स्वामीभक्तांनी तीव्र संताप व्यक्त करण्यात आला.

आज (1 जुलै रोजी) संतप्त स्वामीभक्तांनी, माजी नगरसेवक राकेश कांदे यांच्या नेतृत्वाखाली कुडाळ बसस्थानक आगार प्रमुख रोहित नाईक यांची भेट घेऊन या गैरव्यवहारावर जाब विचारला. यावेळी, यापुढे अशा कोणत्याही गोष्टी खपवून घेतल्या जाणार नाहीत, असा इशारा देण्यात आला. या बैठकीला प्रभाकर कुंटे, पोखरणकर, गोलतकर यांच्यासह इतर स्वामीभक्त उपस्थित होते. या घटनेमुळे एसटी महामंडळाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी स्वामीभक्तांकडून करण्यात येत आहे.