बेदम मारहाण, एकाचा मृत्यू

चौघांना घेतले पोलिसांनी ताब्यात
Edited by: दिपेश परब
Published on: December 21, 2023 19:58 PM
views 732  views

वेंगुर्ले : अंगणात गाडी लावल्याच्या रागातून झालेल्या भांडणात बेदम मारहाण करण्यात आल्याने गंभीर जखमी झालेले तालुक्यातील आरवली- सोन्सुरे येथील नारायण महादेव कावळे (५०) यांचा आज पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास गोवा-बांबूळी येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला. दरम्यान याप्रकरणी त्यांचा मुलगा वैभव कावळे याने दिलेल्या तक्रारीनुसार मयत महादेव कावळे यांचा काका कृष्णा नारायण कावळे (६७), काकी कांचन कृष्णा कावळे (५९), चुलत भाऊ सुहास सुमंत कावळे (४५) व चुलत भावजय समीक्षा सुहास कावळे (४०) यांच्यावर ३०२ खुनाचा गुन्हा दाखल करून त्यांना वेंगुर्ला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.


याबाबत अधिक माहिती अशी की, मयत नारायण कावळे यांचा मुलगा वैभव कावळे याने चारचाकी गाडी अंगणात लावल्याचा रागातून वरील चौघा आरोपींनी वैभवला बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यावेळी मयत नारायण कावळे त्यांची पत्नी व मुलगी वैभवला सोडवायला आले असता दोन्ही गटात जोरदार हाणामारी झाली. यात नारायण कावळे हे गंभीर जखमी झाले. त्यांना तात्काळ गोवा बांबूळी येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. दरम्यान ही घटना १७ डिसेंबर रोजी रात्री १०.३० च्या सुमारास घडली. यानंतर १८ व १९ डिसेंबर रोजी दोन्ही गटातील व्यक्तींवर वेंगुर्ला पोलीसात मारहाणीचे गुन्हे दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचार सुरू असतानाच त्यांची आज पहाटे प्राणज्योत मालवली. बेदम मारहाण झाल्याने त्यांच्या आतडे व गुप्तांगाला गंभीर इजा झाल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला असा अंदाज तेथील वैद्यकिय अधिकार्‍यांनी व्यक्त केला आहे.
      
दरम्यान, याप्रकरणी त्यांच्या मयत यांची काका -काकी, चुलय भाऊ, भावजय या चौघांवर गुन्हा दाखल करुन त्यांना अटक करण्यात आली आहे. यातील दोन्ही गटाचा जमिन जागेच्या कारणावरुन गेली अनेक वर्षे वाद होता. यातून त्यांच्यात नेहमी खटके उडत असल्याची माहिती स्थानिकांकडून मिळाली आहे. आज सायंकाळी उशिरा शवविच्छेदन करून मृत नारायण यांचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे. उशिरा त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल गजेंद्र भिसे करत आहेत