माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, शेखर पाडगांवकरांना पुरस्कार प्रदान

निष्कलंक, निरपेक्ष कार्याचा गौरव : संदेश पारकर
Edited by: विनायक गांवस
Published on: March 20, 2026 15:36 PM
views 33  views

 स्व. प्रा. मिलिंद भोसले, ॲड. दीपक नेवगींना अभिवादन

सावंतवाडी : सिंधुदुर्ग हा स्वाभिमानी अन् कर्तृत्ववान लोकांचा जिल्हा आहे. त्यापैकी एक माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले व निवृत्त अधिकारी, कीर्तनकार शेखर पाडगांवकर आहेत. निष्कलंक, निरपेक्ष हेतूने त्यांनी केलेल्या कार्याचा गौरव कोकण मराठी साहित्य परिषदेने केला आहे. राजकारण, समाजकारणात नव्या पिढीसाठी आदर्श अशी ही व्यक्तीमत्व असल्याचे गौरवोद्गार कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी काढले. स्व‌. प्रा. मिलिंद भोसले स्मृती पुरस्कार माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले तर स्व. ॲड. दीपक नेवगी स्मृती पुरस्कार शेखर पाडगांवकर यांना प्रदान करण्यात आला. याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी निवृत्त उपविभागीय पोलिस अधिकारी दयानंद गवस उपस्थित होते. 

मळगाव इंग्लिश स्कूलच्या सभागृहात हा पुरस्कार वितरण सोहळा मोठ्या दिमाखात संपन्न झाला. यावेळी कोमसाप शाखा सावंतवाडीकडून स्व. प्रा. मिलिंद भोसले सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, साहित्य, कला- सांस्कृतिक सेवा पुरस्कार माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले यांना तर स्व. ॲड. दीपक नेवगी सामाजिक, आध्यात्मिक, साहित्य, विधी सेवा पुरस्कार निवृत्त जिल्हा कामगार अधिकारी, कीर्तनकार शेखर पाडगांवकर यांना मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. तसेच शाखेकडून कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर, निवृत्त उपविभागीय अधिकारी दयानंद गवस यांचाही सन्मान करण्यात आला. 

सत्काराला उत्तर देताना श्री. पाडगांवकर म्हणाले, आजचा सोहळा हा अद्वैत सोहळा आहे. निरपेक्ष काम केल्याच फळ मिळाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. तसेच यापूर्वी अनेक पुरस्कार मिळाले. मात्र, आजचा पुरस्कार माझा उत्साह वाढवणारा अन् प्रेरणा देणारा असल्याची भावना माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले यांनी व्यक्त केली. जनतेच्या साथीनं मी आमदार, मंत्री झालो. जनरल जगन्नाथराव भोसले, प्रतापराव भोसले, भाईसाहेब सावंतांच मार्गदर्शन मला लाभलं. जयानंद मठकर, शिवरामराजे भोसले यांचीही साथ विकासात लाभली. माझ्या कुटुंबान दिलेली साथ फार महत्त्वाची ठरली. तर, शरद पवार यांना मान्य नसतानाही कोकणचं पर्यावरण राखलं जावं म्हणून मी काही भुमिका घेतल्या. कोकण हिताच्या भुमिका घेतल्याने मी मागे पडलो असेन पण, त्याच दुःख नाही असंही मत श्री. भोसले यांनी व्यक्त केले. 

अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना निवृत्त उपविभागीय पोलिस अधिकारी दयानंद गवस म्हणाले, प्रवीण भोसले व शेखर पाडगांवकर यांच कार्य कौतुकास्पद आहे. स्व. मिलिंद भोसले व स्व. ॲड. दीपक नेवगींच्या स्मरणार्थ त्यांना पुरस्कार देण्यात आलेत. समाजात निरपेक्ष हेतूने काम करणारी फार कमी व्यक्तीमत्व उरली आहेत. त्यामुळे नव्या पिढीने यांच्याकडून प्रेरणा घ्यावी असे आवाहन त्यांनी केले.

याप्रसंगी व्यासपिठावर कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर, ऐक्यवर्धक संघ मुंबईचे सचिव आर. आर. राऊळ, स्कुल कमिटी चेअरमन मनोहर राऊळ, कर्नल सुभाष भोसले, सौ. अनुराधा भोसले, अजय भोसले, कोमसाप जिल्हा सचिव ॲड. संतोष सावंत, सावंतवाडी अध्यक्ष दीपक पटेकर, सचिव राजू तावडे, उपाध्यक्ष अभिमन्यू लोंढे, प्रा. दिवाकर मुरकर, प्रा. सुभाष गोवेकर, डॉ. दीपक तुपकर, रामदास पारकर, दिनानाथ नाईक, मेघना राऊळ, प्रज्ञा मातोंडकर, ऋतुजा सावंत-भोसले, कृष्णाजी कोठावळे, चंद्रकांत जाधव, गुरुनाथ गांवकर, नाना नाईक, व्ही.टी. देवण, गुरूनाथ नार्वेकर, विठ्ठल सावंत, निरज भोसले, प्रियांका सावंत, संदेश केरकर, विश्वनाथ आडारकर, सुचिता सावंत आदींसह कोकण मराठी साहित्य परिषद शाखा सावंतवाडीचे सदस्य उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अध्यक्ष दीपक पटेकर यांनी केले. सूत्रसंचालन सहसचिव विनायक गांवस तर आभार सचिव राजू तावडे यांनी मानले.