ठाकरे गटाच्या माजी उपसरपंचाला भाजपच्या कार्यकर्त्यांची बेदम मारहाण

जीवे मारण्याचीही धमकी
Edited by: उमेश बुचडे
Published on: May 08, 2024 12:26 PM
views 1231  views

कणकवली : लोकसभा निवडणुकीला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खारेपाटण विभागातील शेर्पे या गावातील शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे कार्यकर्ते,माजी उपसरपंच बाळा राऊत यांना मंगळवारी सायंकाळी ६.२० वाजता भाजप पक्षाच्या कार्यकर्त्यांनी बेदम मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली. 

त्यामुळे त्यांना तातडीने खारेपाटण प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. खारेपाटण विभागात सध्या तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले असून, शिवसेनेचे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सर्वच प्रमुख पदाधिकारी खारेपाटण येथे सायंकाळी उशिरा दाखल झाले आहेत.

  याबाबत अधिक वृत्त असे की, शेर्पे निवडणूक मतदान सायंकाळी ६ वाजता पूर्ण झाल्यानंतर शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे कार्यकर्ते बाळा राऊत हे शेर्पे येथे दुकानात बसले असता अचानक ६.२० च्या दरम्यान दोन गाड्या भरून कार्यकर्ते आले. त्यानंतर त्यांनी काही समजण्याच्या आत 'मला लाथा बुक्यानी व दांडयांनी मारहाण करून जीवे मरण्याची धमकी दिली' असल्याचे जखमी बाळा राऊत यांनी सांगितले. भाजप पक्षाचे कार्यकर्ते बाळा जठार, दिलीप तळेकर, नाना शेट्ये यांसह भाजप कार्यकर्त्यांनी आपल्याला मारहाण केल्याचे यावेळी बाळा राऊत यांनी सांगितले.

ही घटना समजताच उद्धव सेनेचे जिल्हा प्रमुख संदेश पारकर, नेते सतीश सावंत, अतुल रावराणे, युवा सेना जिल्हा प्रमुख सुशांत नाईक, कन्हैया पारकर, कणकवली उपतालुका प्रमुख महेश कोळसुलकर आदी पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने खारेपाटण येथे दाखल झाले. तसेच खारेपाटण प्राथमिक आरोग्य केंद्र येथे आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.

दरम्यान, कार्यकर्त्याला मारहाण करणाऱ्या भाजप पक्षाच्या कार्यकर्त्यांना तातडीने अटक करून त्यांच्यावर कारवाई न केल्यास जिल्ह्यात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख संदेश पारकर व शिवसेना नेते सतीश सावंत यांनी दिला. उपचार सुरू असलेले जखमी बाब राऊत यांची भेट घेत विचारपूस केली, तसेच या भेटीदरम्यान पदाधिकाऱ्यानी त्यांना धीरही दिला.