आंबोलीत अनधिकृत बांधकामावर वन, महसूलचा हातोडा

''हा ट्रेलर, पिक्चर बाकी'' ; वन जागेतील अतिक्रमणावर बुलडोझर फिरणार : प्रशासन झोपलेल्या प्रशासनाला अखेर जाग
Edited by: विनायक गावस
Published on: March 05, 2024 12:44 PM
views 631  views

सावंतवाडी : आंबोली येथील हिरण्यकेशी परिसरात अनधिकृतपणे उभारण्यात आलेल्या 27 बंगल्यांवर  प्रशासनाकडून कारवाई करण्यात आली. 7 तासात ही अतिक्रमणे हटविण्यात आली. गेले 20 दिवस येथील ग्रामस्थांच या अतिक्रमणाविरोधात आंदोलन सुरू होत. ही अतिक्रमण हटविण्याची मागणी त्यांनी केली होती. अखेर आज 6 जेसीबींच्या सहाय्याने ही बांधकामे पाडकामे पाडण्यात आली. तर वनजमिनीत अतिक्रमण केले असेल तर कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून बुलडोझर फिरवला जाणार. हा केवळ ट्रेलर होता पिक्चर अजून बाकी आहे अशी माहिती प्रशासनानं दिली आहे. त्यामुळे या अतिक्रमण हटावनंतर वन, महसुलच्या पुढील कारवाईकडे आता लक्ष लागून राहिले आहे.

या कारवाईबाबत प्रशासनाकडून कमालीची गुप्तता पाळण्यात आली होती. आता परिसरात असलेल्या अन्य बांधकामांना नोटीसा बजावण्यात येणार असून त्यांच्यावरही कारवाई करण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. आंबोली हिरण्यकेशी परिसरात सर्वे नंबर २३ मध्ये उभारण्यात आलेल्या २७ बंगल्यावर कारवाई करण्याची मागणी स्थानिक ग्रामस्थांकडून करण्यात आली होती. त्यासाठी तब्बल २० दिवस ग्रामस्थांनी त्या ठिकाणी आंदोलन केले होते. त्यानंतर स्थानिकांचा वाढता दबाव लक्षात घेता या ठिकाणी प्रशासनाकडून ते बंगले पाडण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार आज सकाळी ७ वाजल्यापासून या कारवाईला सुरुवात करण्यात आली. दुपारपर्यंत सर्व बंगले जमीनदोस्त करण्यात आले. तसेच त्या ठिकाणी बंगल्यासाठी वापरण्यात आलेल्या पत्रे, लोखंडी अँगल तसेच साहित्य जप्त करण्यात आले आहे. ही कारवाई वन, महसुलच्या प्रमुख अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झाली. 

बांधकाम होईपर्यंत प्रशासन काय करत होत ?

दरम्यान, गेली अनेक वर्षे आंबोली, गेळे, चौकुळचा कबुलायतदार जमिन प्रश्न मार्गी लागत नव्हता. यात राज्यातील सरकारन हा प्रश्न सोडविण्यासाठी पुढाकार घेतल्यानंतर काही ठिकाणी बांधकाम करण्यात आली. गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्र शासनाच्या जागेत ही बांधकाम सुरु होती. काहींना ग्रामपंचायतकडून घर नंबर देखील देण्यात आले. त्यामुळे आज कारवाईची जाग आलेल्या प्रशासनाला इतके दिवस झोप लागली होती ? की झोपेचं सोंग घेतलं होतं असा प्रश्न उपस्थित होते आहे.

या कारवाईनंतर आंबोली ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला. अतिक्रमण हटविल्याबद्दल त्यांनी प्रशासनाचे आभार मानले. तर महाराष्ट्र शासनाने अनेक वर्ष प्रलंबित असणारा कबुलायतदार प्रश्न मार्गी लावून उपभोगत असलेल्या जमिनी ग्रामस्थांच्या ताब्यात द्यावात अशी मागणी केली. यावेळी खासदार विनायक राऊत, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा केसरकर, अँड. अनिल केसरकर, बाळा गावडे आदींनी उपस्थित राहत ग्रामस्थांची भेट घेतली.