सिंधुदुर्ग-रत्नागिरीत प्रथमच अंत्यविधीसाठी 'वैकुंठ रथ' उपलब्ध !

वडिलांच्या स्मृतिप्रीत्यर्थ कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे यांचा उपक्रम
Edited by: उमेश बुचडे
Published on: October 06, 2022 14:28 PM
views 847  views

कणकवली : माझे वडील कै. अनंत नलावडे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ कणकवली शहराला वैकुंठरथ अर्पण करणार असल्याचे नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. सिंधुदुर्ग तसेच रत्नागिरी जिल्ह्यात वैकुंठरथ सुविधा उपलब्ध नसून प्रथमच कणकवली शहरात वैकुंठरथ उपलब्ध होत आहे. यावेळी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, बांधकाम सभापती ऍड. विराज भोसले, नगरसेवक अभि मुसळे उपस्थित होते.

कणकवली शहरातील कोणतीही व्यक्ती मयत झाली असल्यास त्याच्या अंत्यविधीसाठी हा वैकुंठरथ मोफत दिला जाणार आहे. कणकवली व्यतिरिक्त अन्य गावात डिझेल खर्चात हा वैकुंठरथ उपलब्ध असेल. आपला जवळचा माणूस हयात असताना आपण त्यांची सर्व प्रकारे काळजी घेतो. त्याच्या मृत्यूनंतर अंत्यविधी करतानाही साजेशी सुविधा या वैकुंठरथ च्या माध्यमातून उपलब्ध करून देत आहे. माझे वडील कणकवली शहराचे उपसरपंच, कन्झ्युमर्स सोसायटीचे चेअरमन होते. कणकवली शहराशी माझ्या वडिलांची नाळ जुळलेली होती. म्हणून त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ या वैकुंठरथचे शहरवासीयांसाठी लोकार्पण करत आहे असे नगराध्यक्ष नलावडें यांनी सांगितले.

कणकवली शहरातील संजय मालांडकर, रमेश काळसेकर, भरत उबाळे, अण्णा कोदे, समीर पारकर, सदा पारकर हे नेहमी कणकवली शहरात कुठेही मयत झाल्यास त्यांच्या घरी अंत्यविधी च्या तयारीसाठी तत्परतेने जात असतात. त्यांच्याच्याकडे ह्या वैकुंठरथा ची चावी शिवाजी परब, प्रकाश परब यांच्या हस्ते सुपूर्त करण्यात आली.