
वेंगुर्ला : येथील नावबाग खाडी तसेच समुद्र व खाडीच्या मुखाजवळ मत्स्य व्यवसाय विभागामार्फत करण्यात येणाऱ्या मंजूर प्रकल्पातील कामाचा दर्जा आणि प्रत्यक्षात झालेले काम यामध्ये बराच फरक असल्याचा आरोप करत. ठेकेदाराच्या मनमानी कारभारा विरोधात व मत्स्य व्यवसाय विभागाच्या अधिकाऱ्यांच्या विरोधात येथील वेंगुर्ला मच्छीमार सोसायटी व मच्छीमारांनी उपोषणाचा २६ जानेवारी रोजी उपोषणाचा इशारा दिला होता.
दरम्यान, याबाबत मत्स्य व बंदर विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी आज २५ जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक आयोजित केली होती. या बैठकीत संबंधित कामाचा ठेकेदार व मत्स्यव्यवसाय विभागाचे अधिकारी तसेच मच्छीमार सोसायटी व मच्छीमार प्रतिनिधी यांची लवकरच बैठक आयोजित करून मच्छीमारांच्या समस्येचे निराकरण केले जाईल असे आश्वासन मंत्री नितेश राणे यांनी दिले. यानुसार उद्या २६ जानेवारी रोजी होणारे उपोषण मंत्री नितेश राणे यांच्या शब्दाला मानून तात्पुरते स्थगित करण्याचा निर्णय मच्छिमार सोसायटी व स्थानिक मच्छीमारांनी घेतला असल्याची माहिती वेंगुर्ला मच्छिमार सोसायटी चेअरमन सागर म्हाकले यांनी दिली आहे.
नाबार्ड टप्पा २४ अंतर्गत मासळी उतरविण्याच्या ठिकाणी सोई सुविधा पुरवणे या हेड खाली विविध कामांसाठी कोट्यवधींचा निधी प्राप्त झाला. याचे कामही सुरू करण्यात आले. मात्र मंजूर प्रकल्पातील कामाचा दर्जा आणि प्रत्याक्षात झालेले काम यामध्ये बराच फरक असल्याच्या मच्छिमार बांधवांच्या तक्रारी मच्छिमार सोसायटीकडे वारंवार सुरू आहेत. याबाबत संस्थेमार्फत मत्स्यव्यवसाय विभागाकडे वेळोवेळी तक्रारी करून सुद्धा याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याने. तसेच संस्थेला लेखी उत्तर न आल्यामुळे येथील मच्छिमार संतप्त झालेले असून मच्छिमारांच्या हिताचा विचार करता संस्था पदाधिकारी, स्थानिक मच्छिमारांसमवेत २६ जानेवारी २०२५ रोजी ओरोस जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषणाला बसत असल्याचा इशारा वेंगुर्ला मच्छिमार सहकारी सोसायटीच्या वतीने देण्यात आला होता. यावबाबत आज बैठक घेण्यात आली.
मच्छीमार सोसायटी व मच्छीमारांच्या प्रश्नांवर तोडगा न निघाल्यास व सुरू असलेली कामे अंदाजपत्रकाप्रमाणे न झाल्यास मच्छीमारांचे विविध मार्गाने उपोषण व लढा सुरूच राहील असेही सोसायटी चेअरमन म्हाकले म्हणाले. या बैठकीला मत्स्यव्यवसाय व बंदर विकास मंत्री नितेश राणे, जिल्हाधिकारी अनिल पाटील, सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, मत्स्य व्यवसाय विभाग सिंधुदुर्ग चे अधिकारी श्री कुवेस्कर यांच्या सहित मच्छीमार सोसायटीचे संचालक मंडळ व उपोषणकर्ते मच्छीमार उपस्थित होते.