
पोलिसांच्या भूमिकेवर तीव्र नाराजी
सिंधुदुर्गनगरी : शिरगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर आणि फार्मासिस्टवरील जीवघेण्या हल्ल्यानंतर जिल्ह्यातील आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आधीच डॉक्टरांची मोठ्या प्रमाणात रिक्त पदे असून नवीन डॉक्टर जिल्ह्यात येण्यास तयार नसल्याची परिस्थिती आहे. त्यात अशा घटनांमुळे डॉक्टर व कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होत असून जिल्ह्याची बदनामी होत असल्याची खंत व्यक्त करत जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रे व उपकेंद्रांमध्ये सुरक्षा रक्षक नेमण्याचा ठराव जिल्हा परिषद आरोग्य समितीच्या सभेत घेण्यात आला.
जिल्हा परिषद आरोग्य समितीची सभा येथील छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात सभापती प्रितेश राऊळ यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी समिती सचिव तथा जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सई धुरी, सदस्य रुपेश पावसकर, संतोष पारकर, गंगाराम सडवेलकर, सावी लोके, श्रावणी रावराणे, यज्ञा साळगावकर, श्वेता धरणे, तालुका आरोग्य अधिकारी आदी उपस्थित होते.
१० मे २०२६ रोजी शिरगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात कर्तव्यावर असताना डॉ. ऋचा भांडवले आणि फार्मासिस्ट श्रेयस खंगर यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला होता. या घटनेनंतर आरोग्य कर्मचारी रात्री १२ वाजता तक्रार दाखल करण्यासाठी पोलीस ठाण्यात पोहोचले होते. मात्र, तक्रार तत्काळ नोंदवून न घेता पहाटे ५ वाजता दाखल करण्यात आल्याचे सभेत सांगण्यात आले. महिला कर्मचारी उपस्थित असताना तक्रार नोंदविण्यास झालेल्या विलंबाबद्दल सदस्यांनी पोलीस यंत्रणेवर तीव्र नाराजी व्यक्त केली.
सभेत सदस्यांनी सांगितले की, सिंधुदुर्ग जिल्ह्यात डॉक्टरांची अनेक पदे रिक्त आहेत. दुर्गम भाग आणि अपुऱ्या सुविधा यामुळे नवीन डॉक्टर येथे येण्यास टाळाटाळ करत आहेत. त्यातच डॉक्टरांवर हल्ल्यांच्या घटना घडत असल्याने आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रे व उपकेंद्रांमध्ये सुरक्षा रक्षक नेमण्याबाबत शासनाकडे मागणी करण्याचा ठराव सभेत मंजूर करण्यात आला.
दरम्यान, आयुष रुग्णालयाच्या कामकाजाचाही सभेत आढावा घेण्यात आला. रुग्णालयाची संपूर्ण इमारत आयुष विभागाच्या ताब्यात देण्यात आलेली नसून केवळ आठ खोल्या उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. यावर इमारतीची स्थिती तपासूनच ताबा घ्यावा, अशा सूचना सदस्यांनी केल्या.
कुडाळ ग्रामीण रुग्णालयातील परिस्थितीवर चर्चा करताना सदस्य रुपेश पावसकर यांनी तेथे बहुतांश शिकाऊ डॉक्टर कार्यरत असल्याचे सांगत मध्यवर्ती रुग्णालयासाठी अनुभवी आणि सक्षम डॉक्टर उपलब्ध करून देण्याची मागणी केली.










