आंबेडकर, गांधी, नेहरूंचे अनुयायी बोलण्याचे धाडस दाखवत नाहीत : राजू परुळेकर

Edited by: विनायक गावस
Published on: April 05, 2024 08:02 AM
views 146  views

सावंतवाडी : हुकुमशाहीचा गंध जनतेच्या डोक्यात घुसणार नाही याची काळजी घेतली जातेय. आजच्या तरुण पीढीला याची जाण नाही. त्यामुळे संवाद साधण्याचे त्यांच्याकडे ब्रिद नाही. भारतीय लोकशाही धोक्यात आली आहे. आज आंबेडकर, गांधी, नेहरू यांचे अनुयायी बोलण्याचे धाडस दाखवत नाहीत ही खरी खंत आहे असे प्रतिपादन जेष्ठ पत्रकार राजू परुळेकर यांनी सावंतवाडी येथे केले. श्रीराम वाचन मंदिर व क्रीडा भवन सावंतवाडी आयोजित स्वातंत्र्यसैनिक तथा माजी आमदार जयानंद मठकर व्याख्यानमालेत भारतीय "लोकशाही समोरील आव्हाने" या विषयावर ते बोलत होते.  

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अँड. देवदत्त परूळेकर होते. यावेळी व्यासपीठावर वाचन मंदिराचे अध्यक्ष प्रसाद पावसकर, कार्यवाह रमेश बोंद्रे, कार्याध्यक्ष अँड. संदीप निंबाळकर, साहित्यिक प्रा. प्रवीण बांदेकर, सीमा मठकर, मिहीर मठकर आदी उपस्थित होते. लोकशाही समोरील आव्हाने एका रात्रीत उभी राहिली नाहीत. ती निर्माण करणारे देशातीलच आहेत. सन २०१४ मध्ये भाजपा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकार आले ते गेली दहा वर्षे नेतृत्व करीत आहेत. भाजप बरोबर राजकीय नेते पळून गेले आहेत. त्यांना त्यांची जागा निवडणुकी नंतर कळेल.  सध्या विरोधात उभे राहणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला जातोय असे परुळेकर म्हणाले.आपणास ऑक्सिजनची गरज असूनही रिफायनरी उभी राहणार आहे. त्यासाठी जंगले तोडली जाणार आहेत. पण आपण संघर्ष करणार नसाल तर आपले काय होईल याचा विचार करा. महात्मा गांधींनी स्वातंत्र्य प्राप्ती साठी ' करा किंवा मरा' हा मंत्र दिला होता. त्याची आज गरज आहे.जंगल तुटली तर  कोकणातील पश्चिम घाट, समुद्र किनाऱ्यावर त्याचा परिणाम होईल आणि आपणास मोठ्या पर्यावरणीय संकटाला सामोरे जावे लागेल. निसर्ग सर्वांसाठी आहे. तो नष्ट झाला तर अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण होईल. कोकणचा विकास पर्यावरण पूरक असला पाहिजे. त्यासाठी नेतृत्व डोळस पाहिजे. गांधी सारख्या थोर विचारवंताला आज आपण विसरतो आणि गोळ्या घालणाऱ्याचे उदात्तीकरण करतो. त्यामुळे लोकशाही बाबतीत  काय भूमिका घ्यायची ते तुम्ही ठरविले पाहिजे. असे परुळेकर म्हणाले.

यावेळी वंचितचे जिल्हाध्यक्ष महेश परुळेकर, प्रा. विजय फातार्पेकर, सतीश लळीत, अँड सुभाष पणदूरकर, गोविंद वाडकर, कमलताई परूळेकर, अँड. शामराव सावंत, डॉ. दिपक तुपकर, डॉ. जी. ए. बुवा, डॉ. विनया बाड, विठ्ठल कदम, अभय पंडित, मोहन जाधव,इर्शाद शेख, डॉ. सुमेधा धुरी, डॉ. जयेंद्र परुळेकर,  व नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ. सुमेधा धुरी यांनी केले.