
चिपळूण : रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे चिपळूण शहरासह खेर्डी परिसरात पुराचे पाणी शिरले आहे. वाशिष्टी नदीची पातळी ५.९० मीटरवर पोहोचली असून ती धोका पातळीच्या वर वाहत आहे. यामुळे नदीकाठच्या भागात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
चिपळूण नगर परिषदेने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला असून भोंगे वाजवून सूचना देण्यात आल्या आहेत. नदीकिनारी असणाऱ्या नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे, असे आवाहन नगर परिषदेचे मुख्याधिकारी विशाल भोसले यांनी केले आहे.
दरम्यान, मुसळधार पावसामुळे आणि काही भागात पुराचे पाणी शिरल्याने प्रशासन ॲक्शन मोडवर आले आहे. प्रांताधिकारी आकाश लिगाडे, डीवायएसपी बेळे, मुख्याधिकारी विशाल भोसले आणि तहसीलदार प्रवीण लोकरे हे घटनास्थळी उपस्थित राहून परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.
प्रशासनाने नागरिकांना कामाशिवाय घराबाहेर पडू नये, वाहने पाण्यात घालू नयेत, अशा सूचना दिल्या आहेत. दर अर्ध्या तासाला नदीच्या पातळीची माहिती दिली जात असून परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी सतत प्रयत्न सुरू आहेत.