आंबा बागायतदारांपाठोपाठ आता मच्छीमार देखील उतरणार रस्त्यावर

Edited by: नागेश दुखंडे
Published on: April 03, 2026 11:44 AM
views 54  views

देवगड : डिझेल दरवाढीचा फटका देवगड तालुक्यातील मच्छिमारांना देखील बसला असून सामान्य पंपावर डिझेलचा दर साधारण ९२ रुपये असताना, मच्छीमारांना ते ११८ रुपये दराने दिले जात होते. आता मात्र हा दर १४६ रुपये प्रति लिटर केल्याची माहिती मिळत आहे. केंद्र सरकारच्या पेट्रोलियम मंत्रालयाने डिझेलच्या दरात केलेल्या भरमसाठ वाढीमुळे मच्छीमार पूर्णतः कोलमडून गेला आहे.  त्यामुळे मच्छिमारीवर याचा थेट परिणाम झाल्याचे चित्र समोर दिसत आहे. त्यामुळे कुठेतरी मच्छीमार मेटाकुळीस आला असल्याचे वास्तव समोर असल्याचे मच्छीमार नेते ज्ञानेश्वर खवळे यांनी सांगितले आहे.

आखाती देशांमधील युद्धजन्य परिस्थितीचा फटका आता थेट कोकणच्या किनारपट्टीवरील मच्छीमारांना बसू लागला आहे. केंद्र सरकारच्या पेट्रोलियम मंत्रालयाने डिझेलच्या दरात केलेल्या भरमसाठ वाढीमुळे मच्छीमार पूर्णपणे हवालदिल झाले असून, मच्छीमारांच्या या जिव्हाळ्याच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी सर्व मच्छीमार प्रतिनिधी विद्यमान खासदार नारायण राणे यांची कणकवली येथे भेट घेणार असून माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे यांनी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करून आमचा प्रश्न मार्गी लावावा. आम्ही गरज पडल्यास दिल्लीला देखील जाऊ. मात्र, जर हा प्रश्न सुटला नाही,तर आम्हाला रस्त्यावर उतरण्याशिवाय पर्याय उरणार नाही,"असा इशारा देखील ज्ञानेश्वर खवळे यांनी दिला आहे.

यावेळी उमेश आंबेरकर, शामराव पाटील, सचिन कदम, मनोहर बांदेकर, आकाश हरम, सुनील सावंत, प्रभू सुशांत, प्रशांत कोयंडे, देविदास कुबल, पप्पू भिलारे, बापू जुवाटकर, शशिकांत चोपडेकर, विनोद सारंग, उमेश खवळे आदी उपस्थित होते. गेल्या वर्षीप्रमाणेच यावर्षीचा मासेमारी हंगाम धोक्यात येण्याची शक्यता आहे. मासेमारी हंगामाचे शेवटचे दोन महिने (एप्रिल-मे) उरले आहेत. याच काळात मच्छीमार वर्षभराची बेगमी करत असतो. तसेच हा पर्यटनाचाही काळ असल्याने बाजारपेठ गजबजलेली असते. अशावेळी वाढीव दरामुळे बोटी बंद ठेवण्याची वेळ सध्या मच्छीमार बांधवांवर आली असून व्यवसाय परवडत नसल्याने बोटी बंद केल्या तर कामगार दोन महिन्यांचा आगाऊ पगार मागत आहेत. पगार दिला नाही तर पुढच्या वर्षी कामगार मिळणार नाहीत, अशा परिस्थितीत मालक सापडला आहे. पूर्वीप्रमाणेच मच्छीमारांना रिटेल दराने(सर्वसामान्यांप्रमाणे) डिझेल मिळावे,अशी मागणी खवळे यांनी केली आहे. सरकारने मासेमारीला 'कृषी' दर्जा दिलेला असतानाही १४६ रुपयांनी डिझेल विकणे हा मच्छीमारांवर अन्याय असल्याचे यावेळी नमूद केले आहे.. सुरुवातीला 94 रुपये असलेले हे डिझेल 118 रुपये होते आता ते 146 रुपये होणार असे खवळे यांनी सांगितले