कणकवलीवासीयांना त्रास होणारी कामे पूर्ण केल्याशिवाय बॉक्सेल ब्रीजचे काम सुरू करू देणार नाही

नगराध्यक्ष समीर नलावडे यांचा महामार्ग अधिकाऱ्यांना इशारा
Edited by: उमेश बुचडे
Published on: December 09, 2022 11:59 AM
views 217  views

कणकवली : कणकवली शहरातील उड्डाणकुलाच्या बॉक्सेल ब्रीजच्या एसएमएस स्कूल समोरील निकृष्ट झालेल्या कामाची दुरुस्ती करण्याचे काम ठेकेदाराने हाती घेतले होते. त्या संदर्भात कणकवली नगराध्यक्ष यांना भेटून सांगण्यातही आले. पण नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी त्यास हरकत घेतली. कणकवली शहरवासीयांची अनेक कामे प्रलंबित असताना केवळ ठेकेदाराच्या सोयी करता बॉक्सेल ब्रिजची ची भिंत हटवून त्या ठिकाणी काँक्रीट प्लेट लावून तुमचे काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करू नका. आजही नगरपंचायतीची असलेली जुनी पाईपलाईन अनेकदा फोडून ती पाईपलाईन सर्विस रस्त्याखाली घालण्यात आली आहे. त्यामुळे अनेक व्यवसाय करणाऱ्या लोकांना नगरपंचायतकडून पाणीपुरवठा करणे अडचणीचे होत आहे. ही नव्याने पाईपलाईन घालून देण्याबाबत आश्वासन देऊन देखील ठेकेदार कंपनीने कोणतीही कार्यवाही केली नाही.

अनेक ठिकाणी स्ट्रीट लाईट बंद आहेत. वारंवार सूचना केल्या तरी त्याची दुरुस्ती केली जात नाही. गटारांची कामे अर्धवट व काही ठिकाणी कोसळलेल्या स्थितीत आहेत. त्यामुळे जोपर्यंत कणकवली शहरातील जनतेच्या सोयीची कामे पूर्ण होत नाही तोपर्यंत बॉक्सेल ब्रिज चे काम सुरू देणार नाही, असा इशारा नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी दिला.

कणकवली नगरपंचायतमध्ये आज नगराध्यक्ष दालनात महामार्ग प्राधिकरणचे शाखा अभियंता श्री. साळुंखे यांच्यासह अन्य अधिकारी कर्मचाऱ्यांनी नगराध्यक्ष समीर नलावडे व उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांची भेट घेतली. यावेळी चर्चेदरम्यान नगराध्यक्षांनी ठेकेदार कंपनी व महामार्ग प्राधिकरणच्या कामाबद्दल तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. आजपर्यंत फक्त ठेकेदार कंपनी व तुम्ही आश्वासन देत आलात. आश्वासने पूर्ण होत नाही तोपर्यंत बॉक्सेल ब्रिज कोसळण्याचे काम सुरू करायचे नाही. कणकवली नगरपंचायतला कर भरणाऱ्या अनेक महामार्गालगतच्या दुकानदारांना नळ कनेक्शनचे पाणी मिळत नाही. नगरपंचायतने वारंवार आपल्याला सूचना देऊनही आपण याबाबतची कोणतीच कार्यवाही केली नाही. त्यामुळे सर्वप्रथम ही पाईपलाईन नव्याने घालून हे काम पूर्ण करा, अशी मागणी श्री नलावडे यांनी केली.