
वेंगुर्ला : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रुग्ण मोठ्या प्रमाणात उपचारासाठी जीएमसी (गोवा मेडिकल कॉलेज) येथे जातात. अपघातात गंभीर जखमीला तर जीएमसीलाच दाखल करण्यात येते. तसेच हृदयाची बायपास सर्जरी असल्यास येथील रुग्ण शक्यतो जीएमसीलाच जातो. अशावेळी रक्ताची फार मोठी गरज असते. या ब्लड बँकेची स्टोअर मर्यादा सुमारे ५ हजार बॅग्सची आहे. वाढत्या रुग्णांमुळे ब्लड बँकेवर रक्त पुरवठा करतांना मोठा ताण येतो.
सद्य:स्थितीत या ब्लड बँकेत रक्ताचा तुटवडा असल्याने जीएमसीत ब्लडची तातडीची मागणी असल्याने सिंधुरक्तमित्र प्रतिष्ठान सिंधुदुर्गचे सावंतवाडी - दोडामार्ग - वेंगुर्ला विभागीय अध्यक्ष व बांबोळी ब्लड बँक समन्वयक संजय पिळणकर व मित्र संस्थांच्या माध्यमातून दोडामार्ग, सातार्डा व बांदा येथे रक्तदान शिबीरे आयोजित करून यशस्वी केली. त्याला रक्तदात्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
सावंतवाडी व दोडामार्ग तालुक्याप्रमाणेच वेंगुर्ला तालुक्यातही मंगळवार दि. २४ जानेवारी २०२३ रोजी सकाळी १०.०० ते १.०० या वेळेत जि. प. पूर्ण प्राथमिक शाळा परबवाडा नं. १ या शाळेच्या शताब्दी महोत्सवानिमित्त या रक्तदान शिबिराचे आयोजन परबवाडा शाळा नं १ येथे आयुष चॅलेंजर मित्रमंडळ, कणकेवाडी व परबवाडा मित्रमंडळ वेंगुर्ला व सिंधुरक्तमित्र प्रतिष्ठान सिंधुदुर्ग शाखा वेंगुर्ला यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे.
या रक्तदान शिबिराला मोठ्या संख्येने रक्तदात्यांनी, शाळेच्या माजी विद्यार्थ्यांनी, शिक्षकांनी सहभागी होऊन रक्तदान शिबीर यशस्वी करण्याचे आवाहन शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष संदीप परब यांनी केले आहे.
सदर रक्तदान शिबिरात सहभागी होणाऱ्यांनी नाना राऊळ (९४०४१६३५५५), सहदेव परब (८२७५३८१०२५), मंदार किनळेकर (९४२१२६२४१२), शुभम नाईक (९१७२८७३९३७), ऍलिस्टर ब्रिटो (९६७३४६२२७८) यांच्याशी संपर्क साधावा.