पहिलं बालकुमार मराठी साहित्य संमेलन तुळस इथं

Edited by:
Published on: December 10, 2023 15:36 PM
views 44  views

वेंगुर्ला : वेंगुर्ला तालुक्याला समृद्ध असा साहित्यिक वारसा लाभलेला आहे. हा तेजस्वी वारसा उगवत्या पिढीच्या उमलत्या बुद्धीला समजावून दिला पाहिजे. विद्यार्थ्यांमध्ये साहित्याची आवड व ललित साहित्याविषयीची अभिरूची निर्माण व्हावी, मुलांनी अवांतर वाचन करावे, नामवंत साहित्यिकांशी मुलांची भेट घडवून आणावी या उद्देशाने आनंदायात्री वाङ्मय मंडळ वेंगुर्लातर्फे नवांकूर बालकुमार मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन केले असल्याची माहिती ज्येष्ठ साहित्यिक आणि आनंदयात्री वाङ्मय मंडळ वेंगुर्ला शाखेचे अध्यक्ष वृंदा कांबळी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

तुळस येथील श्री शिवाजी हायस्कूलमध्ये २२ व २३ डिसेंबर कालावधीत होणा-या बालकुमार मराठी साहित्य संमेलनाची माहिती देण्यासाठी साई मंगल कार्यालय येथे पत्रकार परिषद आयोजित केली होती. यावेळी वृंदा कांबळी यांच्यासोबत प्रा.सचिन परूळकर, संजय पाटील, महेश राऊळ आदी उपस्थित होते. लेखक, प्रकाशक व संपादक मदन हजेरी हे या बालकुमार मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषविणार आहेत. दि.२२ रोजी सकाळी ९ ते ११ या वेळेत जैतिर मंदिर ते श्री शिवाजी हायस्कूलपर्यंत ग्रंथदिडी, यात ग्रंथदिडीत मराठी भाषेच्या गौरवपर काव्यपंक्तीचे फलक, पारंपारिक वेशातील स्त्री-पुरूष व विद्यार्थी, झांजपथक, ढोलपथक, लेझिमपथक असणार आहे. 

दि. २३ रोजी सकाळी १० वाजता उद्घाटन, ‘कवितेच्या गावा‘ यात प्रस्थापित कवींनी विद्यार्थ्यांसाठी केलेल्या कवितांचे विद्यार्थ्यांनी केलेले सादरीकरण, दुपारी ३ वाजता कथाकथनाची दशसूत्री व कथाकथन, ३.२० वाजता ‘लेखक आपल्या भेटीला‘ यात मान्यवर लेखकांशी विद्यार्थ्यांच्या गप्पांचा कार्यक्रम, ४.१० वाजता संमेलनाचा समारोप होणार आहे.

दरम्यान, या साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर २१ डिसेंबर रोजी सकाळी ९ वा. तुळस येथील श्री शिवाजी हायस्कूलमध्ये वक्तृत्व व कथाकथन स्पर्धा आयोजित केली आहे. वक्तृत्व स्पर्धेसाठी पाचवी ते सातवी आणि आठवी ते दहावी या दोन्ही गटांसाठी ‘माझा आवडता लेखक किवा कवी‘ हा विषय ठेवण्यात आला. लहान गटाने ४ ते ५ मिनिटांत तर मोठ्या गटाने ५ ते ६ मिनिटांत वक्तृत्व सादर करावयाचे आहे. आठवी ते दहावी गटासाठी कथाकथन स्पर्धा असून मराठीतील एक कथा पाच मिनिटात कथन करायची आहे.

आठवी ते दहावी गटासाठी ‘मला आवडलेले पुस्तक‘ यावर ५०० शब्दांत निबंध स्पर्धा आयोजित केली आहे. निबंध कागदाच्या एका बाजूवर सुवाच्च स्वहस्ताक्षरात लिहून १९ डिसेंबरपर्यंत साप्ताहिक किरात, बॅ.खर्डेकर रोड, वेंगुर्ला या पत्त्यावर पाठवावेत किवा हाती द्यावेत. सर्वच स्पर्धेतील प्रथम तीन व उत्तेजनार्थ दोन यांना अनुक्रमे ७७७, ५५५, ३३३, २२२, १११, चषक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येईल. स्पर्धकांनी शाळेचे शिफारस पत्र किवा ओळखपत्र आणणे बंधनकारक आहे. या संमेलनाला उपस्थित रहावे असे आवाहन आयोजकांतर्फे केले आहे.