साळशीत आंबा कलमांना आग | ४ लाखांचे नुकसान

Edited by: नागेश दुखंडे
Published on: March 21, 2024 13:31 PM
views 125  views

देवगड : देवगड येथील साळशी - देवणेवाडीतील शेतकरी सत्यवान भास्कर सावंत यांच्या घरानजीक असलेल्या आंबा व काजू कलमांना आग लागून ४ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. साळशी – देवणेवाडी येथील शेतकरी सत्यवान सावंत यांच्या मालकीच्या घरानजीक असलेल्या आंबा व काजू कलमांना सोमवारी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास वा-यामुळे विद्युत वाहिन्या एकमेकांना चिकटून शाॅटसर्किट झाले.

त्याची ठिणगी गवतावर पडून आग लागली. यामध्ये फलधारणा झालेली १४ आंबा कलमे व २ काजूची झाडे होरपळून गेली. दुपारची वेळ व सोसाट्याचा वारा असल्यामुळे आगीने रौद्र रूप धारण केले. ही घटना समजताच देवणेवाडी ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणली त्यामुळे इतर बागायतदारांची झाडे व इतर नुकसान टळले.  सावंत यांच्या आंब्याच्या झाडावरील काढणीस आलेला आंबा होरपळून गेल्याने हातातोडाशी आलेले पीक हातातून निसटून गेल्याने नुकसान झाले आहे. याबाबत महाराष्ट्र वीज वितरण कंपनीचे कनिष्ठ शाखा अभियंता भाये, ए. आर. फोंडेकर यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी करून चौकशी केली. या घटनेची शिरगांव मंडल अधिकारी आर. ए. निगरे, तलाठी शिरगांव एस. के. खरात, साळशी पोलीस पाटील कामिनी नाईक यांनी घटना स्थळाची पाहणी करून पंचनामा केला.