शिरोडा बाजारपेठेत आगीचे रौद्ररूप ; लाखो रुपयांचे नुकसान

अनेक दुकानांनी घेतला पेट
Edited by: दिपेश परब
Published on: February 24, 2023 18:08 PM
views 807  views

वेंगुर्ले : वेंगुर्ले तालुक्यातील शिरोडा बाजारपेठ तिठा येथे आज दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास अचानक लागलेल्या आगीमध्ये पाच ते सहा दुकानांसह मागील काही भाग जळला आहे. अचानक लागलेल्या आगीमुळे सर्वत्र हाहाकार उडाला असून आग विझवण्याचे शर्तीचे प्रयत्न ग्रामस्थांकडून करण्यात आले. स्थानिक पाण्याच्या टँकर बरोबर वेंगुर्ले नगरपरिषद आणि कुडाळ नगरपंचायतीच्या अग्निशमन बंबाचा वापर करून उशीरा या आगीवर नियंत्रण आणण्यात आले. या आगीमुळे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून शॉर्टसर्किटमुळे ही आग लागली असावी असा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे. फार जुनी ही दुकाने असल्याने तसेच एकमेकाला लागून दुकाने असल्याने वाऱ्याच्या झोक्याने आजूबाजूला आग पसरली आणि बाजूच्या पाच ते सहा दुकानांमध्ये ही आग पोहोचली. स्थानिक ग्रामस्थांनी तात्काळ या दुकानांमधील साहित्य बाहेर काढून नुकसानी टाळण्याचा प्रयत्न केला आहे. वाढती आग लक्षात घेऊन वेंगुर्ले नगर परिषदेचा आणि कुडाळ नगरपंचायतीचा अग्निशमन बंब बोलविण्यात आला आणि त्यांच्याही मदतीने आग विझवण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. देवेंन रेडकर वॉटर टँकर यांचे ही आग विझविण्यात मोलाचे सहकार्य लाभले.

 शिरोडा येथील या दुकानांचे नुकसान

शिरोडा बाजार पेठेतील नारायणी पेंट्स, सुमित चव्हाण चप्पल दुकान, साईश नाटेकर कॉस्मेटिक शॉप, अजित आरावंदेकर यांची सिया मोबाईल शॉपी, सुशील नाटेकर यांचे किराणा दुकान, डॉ. प्रसाद साळगावकर यांच्या दवाखान्याचा मागील भाग, राजा खान सायकल स्टोअर दुकान या साऱ्या दुकानांना ही आग लागल्या मुळे दुकानाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. ग्रामस्थांनी धोका ओळखून आग लागतात काही सामान वेळीच दुकानांमधून बाहेर काढल्याने मोठा अनर्थ टळला आहे. मात्र या दुकानाच्या आगीमुळे आसपासच्या दुकानांचे व घरांचे ही प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे.

दरम्यान विशाल सेवा फाउंडेशन कडून आर्थिक मदतीचे आश्वासन विशाल परब यांनी दिल्याचे माजी सरपंच मनोज उगवेकर यांनी सांगितले. तसेच या नुकसान ग्रस्तांना शिरोडा व्यापारी संघटना, लोकप्रतिनिधी, ग्रामस्थ यांचे कडून आर्थिक सहकार्याचे आवाहन करण्यात येत आहे.