जय अंबे स्नॅक्स अँड डेअरीला आग..!

Edited by: विनायक गावस
Published on: September 17, 2023 12:54 PM
views 139  views

सावंतवाडी : शहरातील जोधा रायका यांच्या मालकीच्या जय अंबे स्नॅक्स अँड डेअरी या दुकानाला आज पहाटे आग लागून सुमारे दीड लाखाचे नुकसान झाले आहे. ही घटना पहाटे चार वाजण्याच्या सुमारास घडली. जागरूक नागरिकांनी वेळीच प्रसंगावधान राखून आगीवर नियंत्रण मिळवत पुढील अनर्थ टाळला.

सकाळी मॉर्निंग वॉकसाठी जाणाऱ्या महिलांच्या ही घटना लक्षात आल्याने त्यांनी तात्काळ पोलिसांना फोन केला. त्यामुळे नगरपरिषदेच्या बंबाच्या सहाय्याने आग आटोक्यात आणण्यात यश आले. यात  बेकरीचे मोठे नुकसान झाले नाही. शॉर्टसर्किटने ही आग लागली असावी अशी शक्यता राणा रायका यांनी व्यक्त केली आहे. काल रात्री उशिरापर्यंत दुकानात गणेशोत्सवाची लगबग सुरू होती. पहाटेच्या दरम्यान ही घटना घडली.

पहाटे चार वाजण्याच्या सुमारास तेथून मॉर्निंग वॉकसाठी जाणाऱ्या दोघा महिलांना दुकानाच्या आतून धूर येताना दिसला. त्यांनी याबाबतची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी त्या ठिकाणी तात्काळ धाव घेतली. तसेच स्थानिकांनी पुढाकार घेतला. न.प.चा बंब घेऊन त्या ठिकाणी पालिकेचे कर्मचारी नंदू गावकर, आरोग्य निरीक्षक वैभव नाटेकर आदी दाखल झाले. बंबच्या सहाय्याने आग विझवण्यात यश आलं. या आगीत रायका यांचे फ्रिज आतील साहित्य, बिस्किट, फरसाण व अन्य विक्रीचे साहित्य जळून खाक झाले आहे. गॅस सिलेंडरसह अन्यही वस्तु दुकानात होत्या. भर बाजारपेठेत हा प्रकार घडला.सुदैवाने वेळीच प्रकार लक्षात आल्यामुळे मोठा अनर्थ टळला.