
कणकवली : कणकवली तालुक्यातील खारेपाटण बंदरवाडी येथे राहणाऱ्या विनायक धोडपिसे यांच्या राहत्या दुमजली घराला सोमवारी सकाळी आग लागून सुमारे ३.५६ लाखांचे नुकसान झाले. सुदैवाने घरात राहणाऱ्या व्यक्तींना कोणतीही दुखापत झाली नाही. परंतु घरातील फर्निचर व इतर साहित्यासह संपूर्ण छप्पर जळून खाक झाले. बागेतील झाडांवर औषध फवारणीच्या पंपाचा वापर करत आग आटोक्यात आणण्यात स्थानिकांनी यश मिळविले. दरम्यान, याबाबत महसूल विभागाने पंचनामा केला असून आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे.
तालुक्यातील खारेपाटण येथील बंदरवाडीमधील विनायक धोंडू पिसे यांच्या मालकीचे दुमजली घर असून या घराला सोमवारी सकाळी १०.३० च्या सुमारास आग लागली. या घराच्या वरच्या मजल्यावर कोणीही व्यक्ती नसल्याने लागलेली आग लक्षात आली नाही. परंतु काही वेळाने घराच्या छपरामधून धुराचे लोट निघू लागल्याने बाजूला काम करणाऱ्या मजूर महिलांनी ही आग निदर्शनास आणून दिली. आग लागल्याचे लक्षात येताच, बंदरवाडी येथील सामाजिक कार्यकर्ते गौरव ढेकणे यांनी तात्काळ धाव घेऊन स्थानिकांशी संपर्क साधला व त्यांच्या मदतीने घटनास्थळी सर्वांनी जमून आग विझवण्याचा प्रयत्न केला अग्निशामक बंबाची सुविधा नसताना या सर्वांनी मोठे मेहनत घेत आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश मिळाले
आगीमध्ये घराचे छप्पर फर्निचर टीव्ही कपाट कपडे पलंग व इतर साहित्य जळून खाक झाले याबाबत महसूल विभागाने पंचनामा केला असता 3 लाख 56 हजार 750 रुपयांचे नुकसान झाल्याचे पंचनाम्यात म्हटले आहे










