शोध साहित्यिकांच्या पाऊलखुणांचा !

वि.स.खांडेकर, जयवंत दळवी,आरती प्रभूंच्या स्मृती स्थळांना भेट
Edited by: विनायक गांवस
Published on: November 03, 2024 18:28 PM
views 149  views

सावंतवाडी : यावर्षी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला.  मराठीच्या या प्रवासात सिंधुदुर्गातील प्रतिभावंत साहित्यिकवि.स.खांडेकर,जयवंत दळवी,आरती प्रभू, मंगेश पाडगावकर, डॉ.वसंत सावंत यांचाही मोलाचा वाटा आहे. असंख्य गाणी, सुंदर कविता व कथा कादंबऱ्या त्यांनी लिहिल्यात.ही सारी साहित्यिक माणसे आभाळाऐवढी असून शब्दांचे ईश्वर, यांचे व्यक्तीमत्व शब्दांपलीकडचे शब्दात न मावणारे आहे. दक्षिण सिंधुदुर्गातील या नामवंत साहित्यिकांच्या घरांना श्री पंचम खेमराज महाविद्यालयाच्या१९८२ च्या विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांनी भेट दिली. साहित्य पर्यटनाचा हा अनोखा अनुभव त्यांनी घेतला.

मराठीला सर्वप्रथम 'ज्ञानपीठ ' पुरस्कार मिळवून देणारे ययातीकार वि.स.खांडेकर  यांच्या शिरोडा  येथील स्मृतीस्थळाला सर्वप्रथम भेट दिली.' जग बदलायचे आहे ' या वाक्याचा सतत पाठलाग करणार त्यांचं जीवन व साहित्य यांचा सुरेख आलेख तिथे मांडलाय. त्यांच साहित्य, त्यांची पत्रे,शिरोड्यातील वास्तव्यातील पाऊलखुणा फोटो व चित्ररूपाने इथे मांडल्या आहेत. मिठाच्या सत्याग्रहाची सचित्र माहिती ह्या सत्याग्रहाच्या तयारीची खांडेकरांनी लिहिलेली हकिकत त्यांच्या चित्रपटांच्या कथा, जुन्या काळातील प्रोजेक्टर व कॅमेरा ज्ञानपीठ पुरस्काराची प्रतिकृती व तो स्विकारतानाचा फोटो आहे. त्या नंतर शिरोड्यात झालेलं जल्लोषी स्वागत तिथे खांडेकर आसपास वावरत आहेत असं वाटत आहे. चौदा मराठी पटकथा,संवाद,गीते दहा हिंदी चित्रपटाच्या कथा दोन तेलगू/तमिळ चित्रपट कथा अस अफाट साहित्य लिहिणारे वि. स.खांडेकर तिथे भेटतात. वाडीतून चालत निघालेल्या खांडेकरांनी मळेवाड तिठ्यावर कुठची वाट निवडू अशी झालेली द्विधा मनस्थिती नंतर त्यांनी पकडलेली शिरोड्याची वाट,

सारं तिथे रेखाटल आहे. त्यानंतर या साहित्यक वारकऱ्यांनी आरवली येथील जयवंत दळवींच्या मूळ घरी भेट दिली. दळवींच्या पुतण्याने सचिन दळवीने त्यांच स्वागत केलं. दळवी व त्यांचा परीवार त्यांचं साहित्य त्यांच्या आठवणीना उजाळा दिला. दळवींच दिडशे - पावणेदोनशे वर्षांपूर्वीच राहत घर बघितलं. वीस खोल्यांचे जीने व माड्या असलेलं पूर्वीच्या काळातल घर पाहताना अंगावर रोमांच अनुभवला.दगडी दारावरच सुंदर नक्षीकाम, गणपतीची खोली, बाळंतीणीची खोली, कामगारांची पेज- भाजी खाण्याची खोली,आंब्याची माडी, जुना चरखाही तिथे आहे. दळवी बसत ती आरामखुर्ची तिथे ठेवलीय. दळवी घरी असताना वाचन करत पण लिखाण करत नसत. इतिहासाच्या या खाणाखुणा दळवीं कुटुंबाने जपून ठेवल्यात. या परीसरात अंगणात इथेच त्यांच्यातला लेखक आकाराला आला.इथली अनेक माणसे त्यांनी रेखाटलीत.मुळात ते मानसशास्त्राचे अभ्यासक त्यामुळे साहित्यात त्यांनी मानवी वर्तनाचे अनेक कंगोरे रेखाटलेत.त्यांच्या घरासमोर असलेल्या ज्या प्राथमिक शाळेत  दळवी शिकले तिथे या चमूने भेट दिली.या शाळेच्या पुढे सुमारे दिडशे मीटरवर खांडेकर ज्या घरात भाड्याने राहत त्या घराला भेट दिली.मराठीतील दोन दिग्गज लेखक या परीसरात वावरले होते. मंगेश पाडगांवकरांच्या उभा दांडा येथील प्राथमिक शाळेला या गटाने भेट दिली.पाठीला दप्तर लावलेलं डोळ्यात भय दाटलेला सात ते आठ वर्षांचा मुलगा

' सांग सांग भोलानाथ,पाऊस पडेल का? शाळेभोवती तळ साचून सुट्टी मिळेल का?"

असं म्हणत शाळेबाहेर रेंगाळत आहे असं दृश्य तिथे डोळ्यासमोर तरळत. सागरेश्वर उभादांडा  येथे राज्यातील पहिले' कवितांचा गाव ' उभं राहिलं.त्या जागेच्या कुंपणाला कूलूप दिसल. व्यवस्थापकाला फोन लावला तर उत्तर मिळाले मी ॲडमिट आहे येवू शकत नाही.त्यानंतर त्यांनी 'बागलांची राय '( कोंडुरा)  जे चिं. त्र्यं.खानोलकर यांचं जन्मस्थळ आहे त्या ठिकाणाला भेट दिली. सागरी महामार्गावरील हा प्रवास वेंगुर्ले, दाभोली, वायंगणी,कोंडुरा, हरिचरणगीरी पार करत पुढे जातो.रस्त्याच्या डाव्या बाजूला माड- पोफळींच्या गर्द  झाडीत चिदानंद स्वामींची संजीवन समाधी आहे.तिथे समोर पिंपळ आहे.निसर्गतः पिंपळाची पाने वारा आला की सळसळतात. एक अनाहुत नाद निर्माण करतात. पण चिदानंद स्वामींच्या ध्यान धारणेत त्यामुळे अडथळा निर्माण व्हायला लागला.तेव्हा स्वामी  म्हणाले' तूझ्या सळसळण्याचा मला त्रास होतोय. त्या क्षणापासून पिंपळाच सळसळण बंद झालं ते आजतागायत. हे अधिकारी पुरूष बागलांचे गुरु होय. खाणोलकरांचा जन्म आजोळी म्हणजे बागलकरांच्या (मामा) घरी झाला.पिंपळाखाली बसून या साहित्यप्रेमी चमूने आरती प्रभूंच्या आठवणींना उजाळा दिला. त्यात ' आरती प्रभू ' हे त्यांचे टोपणनाव कसं पडलं ? कुडाळात ते खानावळ चालवत व तिथे गल्ल्यावर बसल्या -बसल्या वहीवर कविता कशी लिहित. त्यांचा स्वभाव कसा भिडस्त होता. यावर चर्चा झाली.त्यांच्या काही कवितांच रसग्रहण झाले. खोनोलकरांचे जन्मस्थळ असलेल्या बागलांच्या घरी भेट दिली. थोडा वेळ त्या घराच्या व्हरांड्यात बसून त्यांनी  गप्पा मारल्या.आरती प्रभू व त्यांच्या कुटुंबियांबध्दल माहिती घेतली. हे सारे साहित्यिक सावंतवाडीशी निगडित आहेत. खांडेकर, पाडगावकर यांची घर वाडीत आहेत. आरती प्रभू वाडीत शिकलेत. जयवंत दळवी या ना त्या कारणाने वाडीशी निगडित होते.सावंतवाडी ते बागलांची राय हा प्रवास साधारण पंचेचाळीस किलोमीटरचा, या प्रवासाच्या टप्पात भेटणारी ही पवित्र ठिकाण. पर्यटन विभागाने या दृष्टीने विचार करायला हरकत नाही.साहित्य रसिकांनी,शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी जरूर या स्थळांना भेटी द्याव्यात. प्रो.गोडकरांनी असंच एखादं स्मारक कवी वसंत सावंत यांच्या साहित्यावर व आठवणींवर झाले पाहिजे अशी इच्छा व आशा प्रकट केली. या साहित्यिक वारीत प्रो.दिलीप गोडकर,सौ.सुप्रिया गोडकर,प्रो.विजयकुमार फातर्फेकर, दत्तप्रसाद गोठस्कर,  कवी विनय सौदागर, हेमंत झांट्ये,सौ. ममता झांट्ये, सुधीर शिरोडकर,ॲड. डि के गावकर, प्रदीप पेडणेकर , विनय केरकर ,बाळकृष्ण राणे व कु. दक्षल गोडकर सहभागी झाले होते.या साहित्यिक वारीची संकल्पना विनय सौदागर यांची होती.