२४ तासात गुन्हेगाराचा शोध

Edited by: मनोज पवार
Published on: August 30, 2024 07:20 AM
views 934  views

चिपळूण :  'बेवडा' असे हिणवल्याने डोक्यात तीनवेळा गॅस सिलेंडर घालून महिलेची हत्या केल्याबद्दल स्वप्निल पर्शुराम खातू या संशयितास अटक करण्यात आली आहे. गुन्हेगार कितीही सराईत असला तरी तो गुन्हां करताना काहीतरी पुरावा सोडून जातो.त्या पुराव्याच्या आधारे पोलीस सुतावरून स्वर्ग गाठत  आरोपीला गजाआड करतात. अशीच काहीशी गोष्ट, चिपळूण तालुक्यातील सावर्डे जवळील, नांदगाव (गोसावी वाडी) , येथे राहणारे परशुराम पवार  यांच्या पत्नी सुनीता यांच्या खुनाच्या बाबतीत घडली आहे. 27 ऑगस्ट रोजी दहीहंडी उत्सव बघण्यासाठी बाहेर पडलेले परशुराम पवार रात्री आपल्या घरी परतताच,घरात काळोख असल्याचे त्यांना दिसले.त्यांनी आत येऊन लाईट लावताच,आपली पत्नी सुनीता हीचा डोक्यात सिलेंडर मारुन मारेकऱ्यांने खून केल्याचे पाहिल्यावर त्यांनी घडलेल्या घटनेची कल्पना शेजाऱ्यांना दिली.या घटनेचा सावर्डे पोलीस स्थानकात गुन्हा नोंदवण्यात आला.घटनास्थळी पोलिस फौजफाटा दाखल झाला. पण रात्र असल्यामुळे सकाळपासून तपास सुरू झाला. त्यात त्या, महिलेच्या अंगावरचे दागिनेही आरोपीने लंपास केल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. घटनास्थळी शोध मोहीम पथकाने चौफेर शोध घेतल्यावर तेथे सापडलेल्या ब्लूटूथ ने गुन्हेगाराची दिशा दाखवली.ती ब्लूटूथ वापरणारा स्वप्नील खातू याला खाकीवर्दी चा हिसका दाखवताच,त्यांने रात्री दारूच्या नशेत खून केल्याची कबुली पोलिसांना दिली.


हा खून करण्या मागच्या हेतूचा वेगवेगळ्या मार्गाने तपास चालू असून,आरोपीला न्यायालयाने पाच दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. २४  तासाच्या आत आरोपीला अटक करून त्याला कस्टडीचा मार्ग दाखवणाऱ्या कर्तबगार पोलिसांचं  पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी कौतुक करत,कामगिरी फत्ते करणाऱ्या या टीमला रु. ५० हजार रुपयाचं बक्षीस जाहीर केलं आहे.