...अखेर मंत्री केसरकरांकडून बस स्थानकाची पाहणी

अत्याधुनिक सोयी सुविधायुक्त बस स्थानक सावंतवाडीकरांसाठी उपलब्ध करू : दीपक केसरकर
Edited by: विनायक गावस
Published on: August 14, 2023 16:47 PM
views 143  views

सावंतवाडी : सावंतवाडी बस स्थानकाची झालेली दुरावस्था, निधी देऊन ही कामाला अद्याप सुरुवात न झाल्यामुळे सिंधुदुर्ग दौऱ्यावर असलेले शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी सकाळीच सावंतवाडी बस स्थानक परिसराची पहाणी केली. यानंतर एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चेत्रे व एसटी विभागीय अधिकाऱ्यांची याबाबत बैठक घेत दीपक केसरकर यांनी घेतली. सत्ताधारी भाजपसह सर्वच राजकीय पक्ष, सामाजिक संघटनांनी बस स्थानकाच्या दुरावस्थेबाबत तीव्र संताप व्यक्त केला होता. त्यानंतर आज मंत्री दीपक केसरकर यांनी बस स्थानकाची पहाणी केली. 


सावंतवाडी बस स्थानकातील प्रलंबित कामे लवकरच करण्याचे नियोजित आहे. त्या अनुषंगाने आज बस स्थानाकास भेट देऊन पाहणी केली. अत्यावश्यक कामांची माहिती घेतली. विविध अत्याधुनिक सोयी सुविधांनी युक्त  असे बस स्थानक सावंतवाडीकर आणि पर्यटकांसाठी लवकरच उपलब्ध करून देण्यात येईल असं आश्वासन याप्रसंगी दीपक केसरकर यांनी दिल.


शिवसेना ठाकरे गट, मनसेसह राष्ट्रवादीच्या कोकण विभाग महिला अध्यक्षा अर्चना घारे-परब यांनी या बसस्थानकाची दुरावस्था मांडत आंदोलन केलं होतं. त्याचप्रमाणे सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनीही या प्रश्नावर दीपक केसरकर यांच्या वाढदिवसा दिवशी उपोषणाचा इशारा दिला होता. अण्णा केसरकर व सावंतवाडीकरांसह धरणे आंदोलन केलं होतं. तर काही दिवसापूर्वी मित्रपक्ष भाजपचे माजी आमदार राजन तेली यांनी सावंतवाडी येथे पत्रकार परिषदेत बोलताना मंत्री असूनही त्यांना आपल्या घरासमोरील स्टॅन्डची दुरुस्ती करता आली नाही, हे दुर्भाग्य आहे अशी टीका केली होती. या पार्श्वभूमीवर दीपक केसरकर यांनी सकाळीच सावंतवाडी एसटी डेपोची पाहणी केली आहे.


यावेळी व्यवस्थापकीय संचालक शेखर चेत्रे, जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी, प्रांताधिकारी प्रशांत पानवेकर, तहसीलदार श्रीधर पाटील, मुख्याधिकारी सागर साळुंखे, कार्यकारी अभियंतासह माजी उपनगराध्यक्ष राजन पोकळे आदी उपस्थित होते.