अखेर नवीन कुर्ली ग्रामपंचायत निर्मितीचा शासकीय आदेश जारी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदें, ग्रामविकास मंत्री महाजन यांनी दिला न्याय
Edited by: उमेश बुचडे
Published on: August 12, 2023 11:00 AM
views 720  views

कणकवली : देवघर धरणग्रस्त ग्रामस्थांच्या नवीन कुर्ली वसाहत साठी स्वतंत्र ग्रामपंचायत निर्मितीचा शासकीय अध्यादेश आज जारी करण्यात आला असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी नवीन कुर्ली वसाहत मधील ग्रामस्थांची 20 वर्षांहून अधिक वर्षांची मागणी पूर्ण केली असल्याची माहिती शिवसेना जिल्हाप्रमुख संजय आग्रे यांनी दिली.

नवीन कुर्ली वसाहत साठी स्वतंत्र ग्रामपंचायत निर्मिती करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ग्रामविकास विभागाला दिले होते. अलीकडेच शिवसेना जिल्हाप्रमुख संजय आग्रे यांच्या नेतृत्वाखाली नवीन कुर्ली वसाहत प्रकल्पग्रस्त समिती चे पदाधिकारी हरेश पाटील, रविंद्र नवाळे व अन्य सहकाऱ्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली होती.त्यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी ग्रामविकास होण्यासाठी अत्यावश्यक असलेली ग्रामपंचायत निर्मिती प्रस्ताव मंजुरीबाबत ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर ग्रामविकास विभाग सचिवांना स्वतंत्र ग्रामपंचायत निर्मिती चे आदेश दिले होते.

याबाबत चा परिपूर्ण प्रस्ताव सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेकडून विभागीय कोकण आयुक्त कार्यालय आणि आयुक्तांकडून ग्रामविकास सचिवांकडे पाठविण्यात आला होता.याबाबत आज निर्णय झाला असून नवीन कुर्ली वसाहत च्या स्वतंत्र ग्रामपंचायत निर्मितीचा शासकीय आदेश आज जारी करण्यात आल्याचे शिवसेना जिल्हाप्रमुख आग्रे यांनी सांगितले.