
चिपळूण : पावसाळ्यात खेर्डीसह चिपळूण शहरात भरणाऱ्या पुराला कारणीभूत असलेला मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील वाशिष्ठी नदीवरील ब्रिटीशकालीन पूल तोडण्यास अखेर शुक्रवारपासून सुरुवात झाली आहे. पूल तोडण्यासाठी सव्वा कोटीहून अधिक निधी मंजूर होऊनही स्थानिकांच्या विरोधामुळे गेली ३ वर्षे पूल तोडण्याची कार्यवाही थांबली होती. मात्र चिपळूण बचाव समिती आणि नागरिकांच्या पाठपुराव्यामुळे अखेर हा पूल तोडण्याची कार्यवाही सुरू झाली आहे.
तसे पाहिले तर २००५ च्या महापुरानंतर हा जुना पूल चर्चेत आला होता. मात्र २०२१ मधील महापुरात वाशिष्ठी नदीवरील या दोन्ही पुलामध्ये असलेला मातीचा भराव वाहून गेल्यानंतर हा पूल अधिक चर्चेत आला. दरम्यान, महामार्ग चौपदरीकरण अंतर्गत वाशिष्ठी नदीवर नवीन पूलं झाल्यानंतर जुन्या पुलावरील वाहतूक पूर्णतः बंद
करण्यात आली. तत्पूर्वी २०२१च्या महापुरा नंतर हा पूल तोडण्याची मागणी जोर धरू लागली. या पुलामुळे दसपटीकडून येणारे पाणी अडून त्याचा फुगवटा खेर्डीसह शहरात मारत असल्याने हा पूल तोडण्यात यावा, अशी मागणी जोर धरू लागली. त्यानंतर जिल्हा प्रशासनाने हा पूल तोडण्यासाठी १ कोटी २४ लाखाची निविदा काढली. त्यानुसार डिसेंबर २१ मध्ये नियुक्त ठेकेदाराने पूल तोडण्यास
सुरुवात केली असता त्याला विरोध करण्यात आला. कारण गणेशमूर्ती विसर्जनासाठी सद्यस्थितीत हा पूल महत्वाचा ठरत असल्याने पूल तोडू नये, अशी भूमिका विरोधकांनी घेतली होती. गेली ३ वर्षे पूल तोडण्याबाबत बचाव समिती प्रत्येक बैठकांमधून या पुलाचा प्रश्न मांडत होती. विशेषतः समितीचे अरुण भोजने यांनी तर गेल्या १५ ऑगस्टला उपोषणाला बसण्याचा इशारा दिल्यानंतर पूल तोडण्याची कार्यवाही सुरू करत असल्याचे पत्र दिले होते. प्रांताधिकारी आकाश - लिगाडे यांनीही यामध्ये महत्वपूर्ण कामगिरी बजावली. त्यानुसार अखेर हा पूल तोडण्यास सुरुवात झाली आहे.
पुराची तीव्रता कमी होणार
गेल्या अनेक वर्षांपासून बहादूरशेख येथील जुना पूल तोडण्याबाबत आमचा पाठपुरावा सुरू होता. अखेर आमच्या आणि शहरवासियांच्या मागणीला यश आले आहे. प्रांताधिकारी आकाश लिगाडे यांनीही महत्वपूर्ण कामगिरी बजावली आहे. पूल तोडल्यामुळे तसेच आमदार शेखर निकम यांच्या माध्यमातून नलावडा बंधारा भिंत बांधली जात असल्याने या दोन्ही गोष्टीमुळे पावसाळ्यात येणाऱ्या पुराची तीव्रता, नक्कीच कमी होईल, असे चिपळूण बचाव समितीचे अरुण भोजने यांनी सांगितले.