कंत्राटी पद्धतीवर शिक्षक भरतीत निवृत्त शिक्षकांची पदे भरणे म्हणजे "पावळेचा पाणी पाष्टाक" : एम के गावडे

Edited by: दिपेश परब
Published on: July 13, 2023 18:35 PM
views 202  views

वेंगुर्ला : जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षकांची पदे मोठ्या प्रमाणात रिक्त असल्याने विद्यार्थ्यांच्या होणाऱ्या नुकसानीचा विचार करता हे टाळण्यासाठी जिल्ह्यातील सेवानिवृत्त शिक्षकांमधून कंत्राटी तत्वावर तात्पुरत्या स्वरूपात ही रिक्त पदे भरण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दरम्यान जिल्ह्यात एवढे बेरोजगार तरुण असताना अशा सेवा निवृत्त शिक्षकांना पुन्हा सेवेत घेणे म्हणजे शासन "पावळेचा पाणी पाष्टाक" करत असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे प्रांतिक सदस्य एम. के. गावडे यांनी दिली आहे. 

एम. के. गावडे पुढे म्हणाले की, जिल्ह्यात एवढे बेरोजगार तरुण तरुणी असताना हजारो रुपये निवृत्तीवेतन घेणाऱ्या सेवानिवृत्त शिक्षकांची पुन्हा नेमणूक करण्याचा विचित्र प्रकार म्हणजेच दशवतारातील शंकसुराच्या म्हणण्याप्रमाणे "पावळेचा पाणी पाष्टाक" शासन करत आहे. जर सुशिक्षित बेरोजगार जे तरुण तरुणी आहेत यांची याठिकाणी नेमणूक केली तर त्यांना थोडा तरी आधार होईल. या शिक्षक भरती मध्ये शासनाने पुढे जाण्याऐवजी मागे जाण म्हणजे हा विकासाचा भकास आहे असल्याचेही ते म्हणाले.  याबाबत अनेक सुशिक्षित तरुण तरुणींमध्ये असंतोष पसरलेला असून शासनाने यांचा शाप घेऊ नये. त्यामुळे या निर्णयाचा फेरविचार व्हावा व जिल्ह्यातील तरुणांना नोकरीची संधी देऊन न्याय द्यावा अशी मागणी सुद्धा एम के गावडे यांनी केली आहे.