आरोग्य उपसंचालकांकडून वैभववाडीत कर्मचाऱ्यांची झाडाझडती

आरोग्य यंत्रणा गतीमान करण्याच आश्वासन
Edited by: प्रतिनिधी
Published on: October 29, 2022 22:54 PM
views 279  views

 वैभववाडी : आरोग्य उपसंचालक डॉ डी.एस.पांडे यांनी आज अचानक वैभववाडी ग्रामीण रुग्णालयाला भेट दिली. रुग्णालयातील स्वच्छतेसह इतर विभागांच्या कामावरून अधिकारी व कर्मचाऱ्यांना कानपिचक्या दिल्या. रूग्णालय आपले घर आहे आणि येथे येणारा प्रत्येक रूग्ण आपला कुटुंबातील सदस्य आहे या भावनेने कर्मचाऱ्यांनी काम केले पाहीजे अशा शब्दात खडेबोल सुनावले. तसेच हे रुग्णालय सर्व सुविधांनी परिपूर्ण केले जाईल अस आश्वासितही केले.

  श्री.पांडे यांनी येथील ग्रामीण रूग्णालयाला भेट दिली. यावेळी त्यांच्यासोबत जिल्हा शल्यचिकीत्सक श्रीपाद पाटील हे देखील उपस्थित होते.

श्री.पांडे ग्रामीण रूग्णालयात आल्यानंतर रूग्णालयातील प्रत्येक विभागाची इंत्यभुत माहीती घेण्यास सुरूवात केली. रूग्णालयीन व्यवस्थापनावर त्यांनी बोट ठेवताचा अधिकाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली. स्वच्छतेवरून त्यांनी सर्वाना चांगलेच धारेवर धरले. मी डॉक्टर आहे मी फक्त रूग्णांना तपासणार, मी फार्मासिस्ट रूग्णांना औषधेच देणार, मी नर्स इजेंक्शन देणार, मी कारकुन हिशोबाचे काम करणार, या मानसिकतेतुन सर्वानी बाहेर या, सफाई कामगाराने सफाई केली पाहीजेच परंतु आपल्या देखील नजरेस धुळ दिसली तर त्याची स्वच्छता आपण केली पाहीजे त्या गैर काहीच नाही. ज्या ठिकाणी आपण राहतो ते आपले घर आहे. त्यामुळे रूग्णालयातील प्रत्येकाने आपला मीपणा बाजुला ठेवुन काम केले पाहीजे.

वैभववाडी हा ग्रामीण भाग आहे.गरजु,गरीब रूग्ण येथे येत असतात.त्यांच्यावर चांगले उपचार झाले पाहीजे. ग्रामीण रूग्णालयाकडुन अधिकच्या अपेक्षा लोकांच्या आहेत.बहुतांशी उपचार येथे झाले पाहीजेत. अपरिहार्यता असेल तर रूग्णांना पुढे पाठवा अशी सुचना त्यांनी केली.

रूग्णालयीन परिसर तातडीने स्वच्छ करून घ्या, रूग्णांसाठी स्वच्छ पाण्याची व्यवस्था असली पाहीजे. बेडशीड दररोज बदला अशा सुचना त्यांनी केल्या. सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी रूग्णांसाठी अधिकाधिक चांगली सेवा कशी देता येईल यासाठी अभिनव उपक्रम राबविण्याची वृत्ती ठेवली पाहीजे असे देखील त्यांनी स्पष्ट केले.

रूग्णालयातील जीर्ण साहीत्यांचे निर्लेखन करून नव्याने कोणत्या वस्तु हव्या आहेत त्याची मागणी कार्यालयाकडे करा. त्याची पुर्तता करण्यात येईल असे देखील त्यांनी स्पष्ट केले. त्याचबरोबर येत्या पंधरा दिवसांत शस्त्रक्रिया विभाग सुरू करण्यात येईल याशिवाय लवकरच डॉक्टरांची भरती प्रकिया होणार असुन प्राधान्याने वैभववाडीला वैद्यकीय अधीक्षक देण्याचा प्रयत्न केला जाईल अस श्री पांडे यांनी सांगितले.