मिठबावमध्ये पाणीटंचाईची भीती

नदीतील गाळ उपशापूर्वी पर्यायी व्यवस्था करण्याची मागणी
Edited by:
Published on: May 02, 2026 19:35 PM
views 41  views

देवगड : दहिबाव-अन्नपूर्णा नदीपात्रातील गाळ उपशा कामामुळे मिठबाव गावाच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे गाळ उपसा करण्यापूर्वी गावासाठी पर्यायी पाणीपुरवठा व्यवस्था उभी करावी, अशी मागणी पंचायत समिती देवगडचे उपसभापती अमोल विजय लोके यांनी केली आहे.

यासंदर्भात त्यांनी मत्स्यव्यवसाय व बंदर विकास मंत्री तथा पालकमंत्री नितेश राणे यांना देवगड येथील पंचायत समिती भेटदौऱ्या दरम्यान निवेदन सादर केले आहे. या निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, पाणी फाउंडेशन व देवगड- जामसंडे नगरपंचायत यांच्या माध्यमातून देवगड तालुक्यातील दहिबाव-अन्नपूर्णा नदीपात्रातील गाळ उपशाचे काम सुरू आहे. मात्र या कामामुळे मिठबाव गावाचा पाणीपुरवठा बंद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

सध्या मे महिन्याच्या सुरुवातीलाच मिठबाव गावात पाण्याची टंचाई जाणवत असून, जर गाळ उपशामुळे पाणीपुरवठा पूर्णतः खंडित झाला, तर ग्रामस्थांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागेल, असे निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे. सध्या मुंबई स्थित असलेल्या चाकरमानी गावातील धार्मिक कार्याच्या निमित्ताने गावी दाखल झालेले आहेत. गावातील बरीच धार्मिक कार्येही मे महिन्यात असतात या सर्व बाबीचा विचार करावा.तसेच गाळ उपसा करताना आजूबाजूच्या नळ ग्राहकांची पाण्या अभावी गैरसोय होणार नाही याची काळजी घेण्यात यावी अशीही मागणी अमोल लोके यांनी केली आहे.