केंद्रे पुनर्वसन येथे एकरकमी अनुदानासाठी प्रकल्पग्रस्तांचे उपोषण !

Edited by: संदीप देसाई
Published on: March 04, 2024 11:48 AM
views 76  views

दोडामार्ग : केंद्रे खुर्द व केंद्रे बुद्रुक तिलारी धरणग्रस्तांचा वनटाईम सेटलमेंट प्रश्न अद्यापही पूर्ण तडीस लागलेला नाही. या लाभापासून शासकीय यंत्रणा आपल्याला वंचित ठेवत असून त्या अनुदानाची रक्कम तात्काळ लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यासाठी प्रशासनाने कार्यवाही करावी, या मागणीसाठी तेथील प्रकल्पग्रस्त कृष्णा हरिजन, प्रदीप गावडे, भरत गावडे व प्रकाश गावडे यांनी पुन्हा एकदा केंद्रे पुनर्वसन येथील सातेरी मंदिर ठिकाणी उपोषणास सुरुवात केली आहे.


दोडामार्ग तालुक्यातील केंद्रे गावांचे  तिलारी धरणासाठी विशेष बाब म्हणून पुनर्वसन झाले आहे. बुडीत क्षेत्रा बाहेर असलेली ही गावे त्यावेळी संपादित झाली आहेत. या प्रकल्पग्रस्तांना नोकरीऐवजी गोवा व महाराष्ट्र राज्यांनी मिळून पाच लक्ष रक्कम प्रत्येकी देण्याचे मान्य केले आहे. यापैकी महाराष्ट्र शासन १ लाख ३३ हजार ५०० रु. व गोवा सरकार कडून रक्कम ३ लाख ६६ हजार ५०० रुपये अशा विगतवारीने ही भरपाई देण्याबाबत कार्यवाही होणे आवश्यक आहे.

त्यामुळे  जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणी पुनर्वसन उपजिल्हाधिकारी व उपजिल्हाधिकारी यांना एकत्रित बोलावून तात्काळ हे प्रकरण निकाली काढावे व तसा अहवाल गोवा सरकारकडे सादर करून योग्य ती कार्यवाही करावी, या मागणीसाठी प्रकाश गावडे, कृष्णा हरिजन, प्रदीप गावडे, भरत गावडे यांनी उपोषणास सुरुवात केली आहे. यावर कोणताही तोडगा न निघाल्याने रविवार पासुन सुरु झालेले हे उपोषण  दुसऱ्या दिवशीही सुरू आहे. उपोषणकर्ते यांच्या म्हणण्यानुसार शासन आदेश होऊनही प्रशासन नाहक टिपण्या टाकून पात्र प्रकल्पग्रस्त यांना भरपाई पासून वंचित ठेवत असल्याचा उपोषण कर्ते यांचा आरोप आहे.