
सावंतवाडी : आंबेगाव येथील शेतकरी जानू फाले यांना आंबोली येथे अमानुष मारहाण केलेल्या संबंधितावर पाच दिवस उलटूनही पोलीस प्रशासनाने कोणतीही कार्यवाही केली नाही. याबाबत आंबेगाव ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त करीत मंगळवारी सावंतवाडीचे पोलीस निरीक्षक यांची भेट घेत याबाबत संबंधितावर तात्काळ कारवाई न केल्यास सावंतवाडी तालुक्यातील शेतकऱ्यांच्यावतीने पोलीस ठाण्यावर जन आक्रोश मोर्चा काढण्याचा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे.
आंबेगाव येथील शेतकरी जानू फाले हे दुसऱ्याची जमीन कसून आपला उदरनिर्वाह करतात. आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने त्यांना आपल्या जनावरांचा सांभाळ करणे कठीण जात होते. त्यामुळे ते आपले बैल नातेवाईकांकडे सोपवण्यासाठी घेऊन जात असताना आंबोली येथे त्यांना अडवून अमानुष मारहाण करण्यात आली. या घटनेमुळे त्यांना मानसिक धक्का बसल्यामुळे त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला होता. सध्या त्यांची प्रकृती चिंताजनक असून ते अंथरूणाला खिळून आहेत. एका गरीब शेतकऱ्याला अशा प्रकारे मारहाण होणे ही जिल्ह्यासाठी दुर्दैवी बाब आहे. तक्रार करूनही त्यांच्यावर कारवाई होत नाही प्रशासनाची हतबलता आहे. फाले कुटुंब अत्यंत कष्टाळू असून त्यांच्यावर ओढवलेला हा प्रसंग निंदनीय आहे. दोषींवर कठोर कारवाई होणे आवश्यक आहे. या घटनेतील दोषींवर अद्याप कारवाई न झाल्याबद्दल आंबेगाव ग्रामस्थाने तीव्र संताप व्यक्त करीत हा इशारा पोलीस प्रशासनाला दिला आहे. यावेळी आंबेगाव सरपंच शिवाजी परब, रुपेश जाधव, संदेश कारिवडेकर, राहुल राणे, अण्णा केळुस्कर, राजा बरागडे आदी उपस्थित होते.










