
सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात संघटीतपणे एकत्र होत काजूचा दर पाडून खरेदी केला जात आहे. त्यामुळे येथील काजू बागायतदारांचे मोठे नुकसान होत असून शासनाने काजूला योग्य हमीभाव द्यावा, अन्यथा काजू स्वतः खरेदी करावा, अशी मागणी सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी केली आहे. शेतकऱ्यांनो संघटित व्हा, तुमचा काजू कवडीमोल दराने विकू नका, असे भावनिक आवाहनही त्यांनी केले आहे.
याबाबत बबन साळगावकर यांनी पत्रक प्रसिद्धीस दिले आहे. त्यात म्हटले की, कोकणातील प्रमुख उत्पन्न असलेल्या काजूला योग्य हमीभाव मिळत नाही, सध्याच्या काजू सीझनमध्ये शेतकऱ्यांचा काजू अत्यंत कवडीमोल दराने खरेदी केला जात आहे. कोकणच्या काजूची पत एक नंबरची आहे. त्याची चवही चविष्ट आहे, हा काजू देशामध्ये चांगला काजू म्हणून ओळखला जातो. परंतु येथे संघटीत काही जणांकडून काजू दर पाडून खरेदी केला जात आहे. त्यामुळे येथील शेतकरी बागायदारांचे मोठे नुकसान होते. शेतकरी बागायतदारांना न्याय मिळण्यासाठी शासनाने लक्ष देण्याची गरज आहे, कोकण वगळता उर्वरित महाराष्ट्रातील लोकप्रतिनिधी सतर्क राहतात. त्यामुळे तेथील शेतकऱ्यांना हमीभाव प्रत्येक उत्पन्नाचा मिळत असतो. परंतु कोकणात काजूचे मोठ्या प्रमाणात उत्पन्न होत असूनही हमीभाव मिळत नाही, ही शोकांतिका आहे. इथल्या तिन्ही आमदार, खासदारांनी यात वेळीच लक्ष घालावे व शेतकऱ्यांना हमीभाव मिळून द्यावा, नाहीतर असले लोकप्रतिनिधी हवेतच कशाला? असाही टोला त्यांनी लगावला आहे.
श्री. साळगावकर पुढे म्हणाले, इथल्या लोकप्रतिनिधींनी आंबा काजू बागायतदार यांचा प्रश्न कधी सहभागृहामध्ये लावून धरल्याचे दिसलेले नाही. तरी शासनाने दखल घेऊन बागायतदारांना हमीभाव द्यावा किंवा शासनाने काजू स्वतः खरेदी कराव, तरचं शेतकऱ्यांना न्याय मिळू शकतो.