शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी

काँग्रेस शिष्टमंडळाची मागणी
Edited by: लवू म्हाडेश्वर
Published on: June 10, 2025 16:02 PM
views 125  views

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्गात मे महिन्यात झालेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. काजूचा हंगाम अजून संपायचा होता. कोकणातल्या सर्व झाडांना चैत्र पालवी येते. तसेच काजूच्या झाडांना ही ती येते. काजूच्या झाडांना येणारी ही नवीन पालवी  मोहर सुद्धा घेऊन येते या मोहरानेच मिळतात शेतकऱ्याला पाले काजू. या पाले काजूचं उत्पन्न एकूण काजूच्या उत्पन्नाच्या बारा ते पंधरा टक्के पेक्षा जास्त असते त्याशिवाय ते अत्यंत चविष्ट असतात आणि हंगामाच्या शेवटी आल्याने त्यांना रेट सुद्धा चांगला मिळतो परंतु यावर्षी काजू बागायतदारांचे अवकाळी पावसामुळे पाले काजूचे नुकसान झाल्यामुळे कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाले आहे. 

हापुस आंबा हंगाम संपत आला होता परंतु अजून 20% आंबा काढावयाचा होता याचवेळी कॅनिंगचा हंगाम जोमात असणार होता .त्याशिवाय रत्ना सिंधू गोवा मानकूर पायरी करेल आधी सर्वोत्कृष्ट आंबे मे महिन्याच्या शेवटी तयार होतात. यंदा हा सर्व आंबा अक्षरशः कुजून गेला.

कोकमचा हंगाम तर पाच-सहा मे नंतरच सुरू होतो आणि तो आठ दहा जून पर्यंत चालतो परंतु या वेळेस कोकमचे उत्पादन थोडे उशीरा होते आणि या अवकाळी पावसाने सर्व कोकम सुद्धा वाया गेले आहे. यावर्षी त्यामुळे प्रक्रिया उद्योग आणि त्यावर आधारित उद्योग यांना फार मोठा फटका बसला आहे. स्थानिक लोकांना लागणारा उत्तम दर्जाचा आमसूल यावर्षी तयारच होणार नाही तसेच कोकम आगळ कोकम सरबत बनविणाऱ्या गृह उद्योगांचा सुद्धा फार मोठा तोटा होणार आहे. त्याच बरोबर भुईमूग, मिर्ची, कलिंगड अशा अनेक पीकांचे अतोनात नुकसान झाले आहे. या अस्मानी संकटात शासनाने तात्काळ मदत करावी अशी शेतकरी आस बाळगून आहे. तरी आपण नुकसानी संदर्भातील वस्तुनिष्ठ अहवाल शासनाला पाठवून शेतकऱ्यांना तातडीने नुकसानभरपाई मिळवून द्यावी अशी विनंती केली आहे.

यावेळी प्रांतिक सदस्य प्रकाश जैतापकर, जिल्हा उपाध्यक्ष विजय प्रभू, सरचिटणीस अरविंद मोंडकर, प्रवीण वरूनकर, विनायक मेस्त्री, सावंतवाडी तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर, कुडाळ तालुकाध्यक्ष अभय शिरसाट, माजी जिल्हा युवक काँग्रेस अध्यक्ष देवानंद लुडबे, प्रवीण मोरे, वेंगुर्ला युवक काँग्रेस अध्यक्ष प्रथमेश परब, ओरोस शहर अध्यक्ष महेश परब, व्ही.के. सावंत,बाबू गवस, सावंतवाडी सेवादल अध्यक्ष संजय लाड, सुभाष नाईक इत्यादी उपस्थित होते.