शेतकरी, आरोग्यप्रश्नी मंगेश तळवणेकर आक्रमक

Edited by: विनायक गांवस
Published on: November 03, 2024 13:04 PM
views 202  views

सावंतवाडी : ५० हजारांचा भुर्दंडामुळे शेतकरी वर्गाचा तसेच आरोग्याचा प्रश्न सोडवण्यामध्ये दीपक केसरकर कमी पडलेत. त्यामुळे आता शेतकऱ्यांनी एकसंघ होणे गरजेचे आहे. येत्या 23 तारीखेला आमदार बदलण्याची वेळ असून शेतकऱ्यांनी आपला स्वाभिमान दाखवून द्यावा, अन्यथा राज्यकर्त्यांनी वा केसरकरांनी हा प्रश्न सोडविण्याचा शब्द देव पाटेकराच्या साक्षीने द्यावा. अन्यथा एकतर आमदार बदलेल किंवा राजकारणातून मी संन्यास घेईन असे विधान शेतकरी संघटनेचे नेते माजी शिक्षण व आरोग्य सभापती मंगेश तळवणेकर यांनी केले.

ते म्हणाले, तुम्हाला शेवटची संधी म्हणून तुम्ही झाड तोडल्यास होणारा शेतकऱ्यांना 50 हजाराचा दंड आणि इथल्या आरोग्याचा प्रश्न सोडवण्याचा शब्द आम्हाला द्या असेही श्री तळवणेकर म्हणाले. शहरातील गांधी चौकात श्री. तळवणेकर यांनी शेतकऱ्यांची बैठक घेतली. शासनाकडून नव्याने काढण्यात आलेल्या निर्णयानुसार एक झाड तोडण्यास पन्नास हजार रुपयांचा दंड यासंदर्भात त्यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. गेले कित्येक दिवस मी या प्रश्नावर बोंब मारत आहे. आज शेतकरी शासनाच्या या निर्णयामुळे भीतीच्या छाये खाली आहे. आपल्या मुलीच्या मुलाच्या लग्नासाठी शेतकऱ्यांनी लावलेले झाड जर शेतकऱ्याला तोडता येत नसेल तर उपयोग काय आज गरीब शेतकरी आजारी पडल्यास तसेच त्याला एखाद्या प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये पैसे द्यावे लागल्यास आपले झाड विकून तो हॉस्पिटलचा खर्च भागवतो. मात्र, नव्या शासन निर्णयामुळे आज शेतकरी तेही करू शकत नाही. त्यामुळे इथल्या शेतकऱ्याला बांबोळी शिवाय पर्याय नाही. सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचा विचार करता या ठिकाणी आरोग्याचा प्रश्न बिकट आहे. गरीब शेतकऱ्याला या ठिकाणी उपचार मिळत नाहीत. त्यामुळे उठ त्याला बांबोळीवारी करावी लागत आहे. शेतकऱ्यांनी आपल्या हितासाठी आता डोळे उघडून जागे होण्याची हीच वेळ आहे.

माझा कुठल्याही पक्षावर रोष नाही. परंतु, जो कोण आमचा हा प्रश्न सोडवण्याचा शब्द देईन त्याच्या पाठीमागे आम्ही राहणार आहोत. मात्र गेले पंधरा वर्षे या ठिकाणी आमदार म्हणून राहिलेल्या केसरकर यांनी आमच्या या प्रश्नाकडे दुर्लक्ष केले आहे. त्यांना निवेदाने देऊनही त्यांनी पाहिले नाही. त्यांच्यासोबत असलेल्या सावंतवाडी दोडामार्ग आणि वेंगुर्ल्यातील अष्टप्रधान मंडळींनी ही त्यांचे लक्ष वेधले नाही. यांना निवडून आणण्यामध्ये आम्ही मेहनत घेतली‌‌. परंतु आज आमच्या प्रश्नावर विचार करायलाही यांना वेळ नाही. दुसरीकडे नितेश राणे, नारायण राणे पहिल्यांदा मतदारसंघातील लोकांना प्राधान्य देतात. मात्र, इथे मतदारसंघातील लोकांना प्राधान्य मिळत नाही.

त्यामुळे आत्ता ही सुरुवात असून येणाऱ्या काही दिवसांमध्ये गावागावांमध्ये जाऊन शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करणार आहे. शेतकऱ्यांनी आपला स्वाभिमानी बाणा दाखवून एकसंघ होणे गरजेचे आहे असे श्री तळवणेकर म्हणाले.