कमी श्रमात अधिक उत्पन्न | शेतकऱ्यांनी धरली श्री पद्धतीची कास

परमे गावचे सरपंच प्रथमेश मणेरिकर यांच्या हस्ते झालं भात बियाण्याचे वाटप
Edited by: संदीप देसाई
Published on: June 20, 2023 17:50 PM
views 78  views

दोडामार्ग : कमी श्रमात अधिक उत्पन्न मिळविण्यासाठी शेतकऱ्यांनी श्री पद्धतीची कास धरावी असे आवाहन परमे गावचे सरपंच प्रथमेश मणेरिकर यांनी केलं आहे. 

श्री पद्धतने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना परमे येथे सिंधूरत्न योजनेअंतर्गत सरपंच  मणेरिकर यांच्या हस्ते शेतकऱ्यांना मोफत भात बियाणे वाटप करण्याचा कार्यक्रम नुकताच घेण्यात आला. यावेळी ते बोलत होते. यावेळी माजी सरपंच सौ. अनिता नाईक, शेतकरी श्रीकांत गवस, गजानन मणेरिकर, पांडुरंग वझरेकर, सौ. ममता वझरेकर, शिवाजी सावंत, सौ. घोगळे, वेदांत गावडे आणि इतर शेतकरी उपस्थित होते. यावेळी कृषी अधिकारी साईराम शिंदे यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. शेतकऱ्यांना रत्नागिरी 8 या कोकण कृषी विद्यापीठाच्या संशोधित वाणाचे  वाटप करण्यात आले.

यावेळी उपस्थित शेतकऱ्यांना श्री पद्धतीत भात लागवड करण्याचे फायदे कृषी अधिकारी श्री शिंदे यांनी समजावून सांगितले. कमी श्रमात अधिक उत्पादन मिळवायचे असेल तर श्री पद्धत काळाची गरज असल्याचे मार्गदर्शन त्यांनी केले.  रत्नागिरी 8 हे सुगंधित संशोधित भात बियाणे असून यापासून भरपूर उत्पन्न मिळते, असा गेल्या वर्षातील शेतकऱ्यांचा अनुभव असल्याचे त्यांनी सांगितलं. त्याचबरोबर या भातपिकापासून होणारा तांदूळ उच्च दर्जाचा असतो, असेही कृषी विभागामार्फत स्पष्ट करण्यात आले. त्यामुळे अधिकाधिक शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेऊ भरघोस उत्पन्न घ्यावे, असे आवाहन सरपंच  मणेरिकर यांनी केले आहे.